दिल्ली विधानसभेत आमदारांच्या वेतन वाढीचा प्रस्ताव मंजूर झाला असून आमदारांच्या पगारात तब्बल ४०० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आमदारांना यापुढे ८८ हजार रुपयांच्या जागी दरमहा २ लाख १० हजार रुपये वेतन मिळणार आहे. वेतनातील घसघशीत वाढीसोबत आमदारांच्या विविध भत्त्यांमध्ये तसेच पेंशनमध्येही वाढ करण्यात आली आहे.

दिल्लीतील आमदारांचा महिन्याचे मूळ वेतन(बेसिक) १२ हजार रुपये इतके होते. त्यात ४०० टक्क्यांची वाढ करून ते आता ५० हजार इतके करण्यात आले आहे. तसेच मूळ वेतनाशिवाय विधानसभा क्षेत्र भत्ता १८ हजाराहून ५० हजार केला आहे. यापूर्वी आमदारांना केवळ देशातील विविध भागांमध्ये भेटी देण्यासाठी प्रवास भत्ता मिळत होता, पण केजरीवाल सरकारच्या या विधेयकामुळे आता आमदारांना परदेश दौऱयासाठीचाही भत्ता मिळणार आहे.

आमदारांसोबतच विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्याच्या पगारातही वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी हे विधेयक सादर केल्यानंतर ते मंजूर होत असताना पगारवाढीला विरोध दर्शवत भाजप आमदारांनी सभात्याग केला.