News Flash

दिल्लीचा कौल हा ईव्हीएमचा नव्हे तर देशाचा कौल; अमित शहांचा केजरीवालांना टोला

केजरीवालांनी भाजपच्या बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांना भेटले पाहिजे.

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत जनतेने भाजपच्या बाजूने दिलेला कौल हा देशाचा कौल असल्याची प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केली. ईव्हीएम यंत्रांमुळे भाजपचा विजय झाल्याचा केजरीवाल यांचा आरोपही शहा यांनी फेटाळून लावला. अमित शहा यांनी मंगळवारी दिल्ली महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावत भाजपचे यश निर्भेळ असल्याचा दावा केला. अरविंद केजरीवाल यांना भाजपच्या विजयाचे खरे कारण जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी भाजपच्या बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांना भेटले पाहिजे. भाजपचा दिल्लीतील विजय हा मैलाचा दगड असून येथील अनागोंदी कारभार संपुष्टात आल्याचे द्योतक असल्याचेही शहा यांनी सांगितले.

केवळ दोनच वर्षांपूर्वी दिल्ली विधानसभेमध्ये ७० पैकी ६७ जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळविणाऱ्या आम आदमी पक्षाला (आप) दिल्लीतील तीन महापालिकांच्या निवडणुकांमध्ये बुधवारी  दारूण पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले होते. दहा वर्षांची ‘अँटी इन्कम्बन्सी’ (विरोधी जनमत) असतानाही भाजपने उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिल्ली या तीन महापालिकांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक जागा मिळवून यशाची मालिका कायम ठेवली. २७० पैकी भाजपला १८२ जागा, ‘आप’ला ४६, तर काँग्रेसला जेमतेम ३२ जागा पदरात पाडता आल्या. या पराभवाचे खापर ईव्हीएम यंत्रांवर फोडण्याचा आटापिटा आपने प्रारंभी केला; पण नंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे अभिनंदन केले होते.

दिल्लीकरांनी भाजपच्या पारड्यात भरभरुन दान टाकल्याने हे यश पक्षाच्यादृष्टीने ऐतिहासिक मानले जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश , मणिपूर, उत्तराखंड विधानसभा निवडणुकीतही भाजपला अशाचप्रकारचे अभूतपूर्व यश मिळाले होते. त्यामुळे आता दिल्लीत मिळालेले यश भाजप कार्यकर्त्यांचा हुरुप वाढवणारे ठरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 1:39 pm

Web Title: kejriwal may term it evm victory but delhi mandate is nations mandate amit shah
Next Stories
1 अखेर हुतात्मा परमजीत सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार
2 इन्फोसिस १० हजार अमेरिकन कर्मचाऱ्यांची भरती करणार
3 पाकिस्तानच्या ५० सैनिकांची मुंडकी आणा; शहीद जवानाच्या मुलीचा संताप
Just Now!
X