दिल्लीत सत्तास्थापन करण्यासाठी घोडेबाजार जोरात सुरू असल्याचा आरोप करणाऱया आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका स्टिंग ऑपरेशनची सीडी सुपूर्द केली. भाजपचे एक ज्येष्ठ नेते आम आदमी पक्षाच्या आमदाराला पैशांचे आमीष दाखवत असल्याचे स्टिंग ऑपरेशनमधून दिसत असल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणाऱया भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्यासाठी नजीब जंग यांनी राष्ट्रपतींकडे मागितलेल्या परवानगीचा फेरविचार करावा, अशीही मागणी आम आदमी पक्षाने केली. ४ सप्टेंबरला नजीब जंग यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून त्यांच्याकडे भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्यास परवागनी देण्याची मागणी केली होती. त्याला ‘आप’ने विरोध केला.
भाजपचे एक ज्येष्ठ नेते आम आदमी पक्षाच्या खासदाराला फोडण्यासाठी ४ कोटी रुपये देण्याचे आमीष दाखवत असल्याचे स्टिंग ऑपरेशनमधून दिसत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. याच स्टिंग ऑपरेशनची सीडी पक्षाने नजीब जंग यांच्याकडे दिली. यावेळी केजरीवाल यांच्यासोबत मनिष सिसोदिया हेदेखील उपस्थित होते. ‘आप’ने याआधीही दिल्लीत सत्तास्थापनेसाठी भाजपकडून घोडेबाजार केला जात असल्याचा आरोप केला आहे.