देशाला भ्रष्टाचारापेक्षा जातीयवादाचा जास्त धोका असल्याचे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इस्लामिक सांस्कृतिक केंद्रात झालेल्या एका कार्यक्रमात म्हटले.  देशातील भ्रष्टाचार ‘झाडू’न टाकण्याच्या उद्देशाने उदयास आलेल्या आम आदमी पक्षाचा आता देशात जातीयवादी राजकारण फोफावत असल्याच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे केजरीवालांनी आपल्या विधानातून अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढणार का? या प्रश्नाला बगल देत अरविंद केजरीवालांनी देशात जातीयवादी राजकारण सुरू असल्याचे म्हटले. केजरीवाल म्हणतात, सध्या देशात भ्रष्टाचारापेक्षा जातीयवादाचा धोका निर्माण झाला आहे आणि राजकीय पक्षच जातीयवादाला कारणीभूत आहेत. मतांच्या राजकारणासाठी देशात जातीयवाद निर्माण करण्याचे काम या राजकीय पक्षांनी आजवर केले आहे. खरे सत्य लक्षात घेता, जातीयवादाच्या मुद्द्यावरून मते झोळीत पाडणाऱया या पक्षांनी म्हणजेच भाजपने हिंदूंसाठी आणि काँग्रेसने मुस्लिमांसाठी प्रत्यक्षात काहीच केलेले नाही. असेही केजरीवाल म्हणाले.