गेले दोन दिवस दिल्ली पोलीसांविरोधात धरणे आंदोलनास बसलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बुधवारी सकाळी तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. केजरीवाल यांच्यावर काही चाचण्या करण्यात येणार आहेत, त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
केजरीवाल यांना मंगळवारी रात्रीपासून ताप आला असून त्यांच्या छातीमध्येही जंतूसंसर्ग झाल्याचे यशोदा रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. रुग्णालयात त्यांच्या सीटीस्कॅनसह अन्य चाचण्या करण्यात येणार आहेत. केजरीवाल यांचे डॉक्टर बिपिन मित्तल हेदेखील यावेळी त्यांच्यासोबत आहेत. दिल्ली पोलीस दलातील चार अधिकाऱय़ांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचे अन्य सहकारी रेल भवनाजवळ जवळपास ३० तास आंदोलनाला बसले होते. यावेळी ते ऐन थंडीमध्ये रस्त्यावर झोपले. त्यामुळेच त्यांना ताप आला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.