अमेरिकेतील हवाई विद्यापीठाचे संशोधन 

वॉशिंग्टन : दहा वर्षांपूर्वी सोडण्यात आलेल्या नासाच्या केप्लर दुर्बीणीने शोधलेला पहिला संभाव्य बाह्य़ग्रह हा आता खरोखर बाह्य़ग्रह ठरला आहे असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. या बाह्य़ग्रहाचे नाव केप्लर १६५८ बी असून तो तप्त गुरू ग्रहासारखा आहे. तो त्याच्या मातृताऱ्याभोवती ३.८५ दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो, असे अमेरिकेतील हवाई विद्यापीठाच्या संशोधकांनी  सांगितले.

मातृताऱ्याचा व्यास पृथ्वीवरून सूर्य पाहताना असतो त्याच्या साठ पट जास्त आहे. केप्लर दुर्बीणीने अनेक संभाव्य बाह्य़ग्रहांचा शोध लावला होता. ही दुर्बीण २००९ मध्ये सोडण्यात आली होती. त्यात संक्रमण पद्धतीने ग्रहांचा शोध घेण्यात आला. ग्रह ताऱ्यासमोरून जाताना त्याचा प्रकाश किंचित कमी होतो त्यातून अप्रत्यक्ष पद्धतीने यात ग्रहाचे अस्तित्व शोधले जाते. यात इतर कारणामुळे संक्रमणात जसा ताऱ्याच्या प्रकाशात फरक पडतो तसा पडू शकतो त्यामुळे या संभाव्य बाह्य़ग्रहांचे अस्तित्व इतर पद्धतींनी निश्चित केले जाते असे अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल जर्नल या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनात म्हटले आहे. केप्लर दुर्बीणीने २०११ मध्ये केप्लर १६५८ बी हा संभाव्य बाह्य़ग्रह शोधून काढला होता तो खडकाळ आहे. त्याच्या मातृताऱ्याचा त्यावेळी केलेला अंदाज चुकीचा ठरला असून तारा व केप्लर १६५८ बी ग्रह हे आकाराने मोठे आहेत.

हवाई विद्यापीठाचे अ‍ॅशले चॉनटॉस यांनी सांगितले की, नवीन विश्लेषणानुसार ताऱ्यांच्या ध्वनिलहरी वापरू न या ग्रहाच्या व मातृताऱ्याच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. केप्लर १६५९ बी हा गुरूसारखा तप्त ग्रह असून तो तीन पटींनी मोठा आहे.

केप्लर १६५९ हा तारा  सूर्यापेक्षा जास्त वस्तुमानाचा व तीन पटींनी मोठा आहे. केप्लर १६५९ बी हा ग्रह त्याच्या ताऱ्यापासून कमी अंतरावरच्या कक्षेतून फिरतो. तो ताऱ्याच्या व्यासाच्या दुप्पट अंतरावरून फिरत असल्याने ताऱ्याभोवतीचा तो सर्वात जवळचा ग्रह आहे. या ग्रहावरून उभे राहून पाहिले तर त्याचा मातृतारा सूर्याच्यापेक्षा ६० पट अधिक व्यासाचा दिसेल अशी अटकळ आहे. केप्लर १६५८ ताऱ्याची ग्रहमाला गुंतागुंतीची असून त्यांचे निरीक्षण करणे अवघड आहे.

ठळक मुद्दे

* केप्लर १६५८ बी हा केप्लर दुर्बीणीने शोधलेला पहिला संभाव्य बाह्य़ग्रह

* तो खरोखर बाह्य़ग्रह असल्याचे ताऱ्याच्या ध्वनिलहरींच्या अभ्यासातून निष्पन्न

* ताऱ्याभोवती ३.८५ दिवसात एक प्रदक्षिणा