६.५ सेंटीमीटरचा स्क्रू केरळमध्ये एका हत्येची उकल करण्यासाठी पुरेसा ठरला आहे. फ्रॅक्चर झाल्यावर वापरण्यात आलेल्या स्क्रूमुळे एका महिलेची ओळख पटली असून प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याचा संशय आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोच्चीजवळील कुंबलम या भागात मच्छिमारांना सिमेंट- काँक्रीटने भरलेला एक पिंप सापडला होता. या पिंपातून दुर्गंधी आल्याने स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पिंप फोडला असता काँक्रीटमध्ये महिलेचा सांगाडा सापडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृतदेहाची ओळख पटत नव्हती. त्यामुळे हा गुन्ह्याचा तपास अडकला होता. मात्र, सांगाड्यात हाडांना जोडण्यासाठी वापरण्यात येणारा साडे सहा इंचाचा स्क्रू आढळला. हा एक स्क्रू पोलिसांच्या तपासाला दिशा देण्यासाठी पुरेसा ठरला.
धातूचे स्क्रू बनवणाऱ्या कंपन्यांचा पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली. तो स्क्रू पुण्यातील एका कंपनीने तयार केला होता आणि कंपनीचे कोच्चीत वितरक होते. या स्क्रूचा वापर करुन केरळात जवळपास ३०० शस्त्रक्रिया झाल्या. यातील सहा शस्त्रक्रिया कोच्चीत झाल्या होत्या. पोलिसांनी कोच्चीतील रुग्णांचा शोध घेतला असता पाच रुग्णांची माहिती मिळाली. तर सहावी रुग्ण एक महिला असून ती बेपत्ता असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

सखोल तपासानंतर तो मृतदेह शंकुतला नामक महिलेचा असल्याचे उघड झाले. सप्टेंबर २०१६ मध्ये तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार झाले होते. दुचाकीवरुन पडल्याने शंकुतला यांना गंभीर दुखापत झाली. तुटलेले हाड सांधण्यासाठी स्क्रूचा वापर करण्यात आला होता.
शकुंतला या घटस्फोटित होत्या. विभक्त झाल्यानंतर त्या कोच्चीजवळ मुलगा प्रकाश आणि मुलगी अवतीसह राहु लागल्या. याच दरम्यान त्यांची साजित नामक व्यक्तीशी झाली. या ओळखीचे रुपांतर काही दिवसांनी प्रेमसंबंधांमध्ये झाले. मात्र, काही महिन्यानंतर साजित आधीपासून विवाहित असून त्याला मुलं देखील आहेत, अशी माहिती शकुंतला यांना मिळाली. या वरुन त्यांच्यात वाद झाला होता, अशी माहिती समोर आली. मात्र, या प्रकरणातील संशयित आरोपी साजितनेही आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. शंकुतला यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागल्याचे समजताच त्याने आत्महत्या केली होती.  त्यामुळे हत्येची उकल झाली तरी आरोपीला अटक करता आली नाही.