कोल्लमनजीकच्या पुट्टिंगल मंदिरातील दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लगेचच घटनास्थळाला दिलेल्या भेटीमुळे मदतकार्यादरम्यान पोलीस यंत्रणेवरील ताण वाढल्याचे सांगत केरळचे पोलीस महासंचालक टी.पी. सेनकुमार यांनी नाराजी व्यक्त केली. १० एप्रिलला झालेल्या या दुर्घटनेत ११४ जण मृत्युमुखी पडले. ही घटना घडल्यानंतर मोदींनी अवघ्या १२ तासांत घटनास्थळाला भेट दिली. मी त्यांच्या या भेटीबद्दल आक्षेप नोंदवला होता. पंतप्रधानांनी याठिकाणी दुसऱ्या दिवशी भेट द्यावी, असा पर्यायही मी सुचवला होता. मात्र, पंतप्रधानांना त्याचदिवशी भेट द्यायची होती. संपूर्ण पोलीस यंत्रणा पहाटेपासून याठिकाणी मदतकार्यात गुंतली होती. त्यावेळी खूप काम बाकी होते, त्यामध्ये घटनास्थळी साधी पाणी पिण्याची व्यवस्था नसल्याने सर्वचजण खूप दमले होते. अशावेळी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या भेटीमुळे पोलीस यंत्रणेला त्यांच्या सुरक्षेच्या कामात जुंपावे लागले, असे सांगत सेनकुमार यांनी नाराजी व्यक्त केली. मी त्यावेळी घटनास्थळावरच उपस्थित होतो. त्याठिकाणी कामाचा प्रचंड ढिगारा पाहता मी या भेटी सोमवारपर्यंत पुढे ढकलण्याचा पर्याय सुचवला होता. मात्र, पंतप्रधानांनी एकदा निर्णय घेतल्यानंतर आम्हाला त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करणे भाग असते, अशी हतबलताही त्यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना व्यक्त केली.