केरळमध्ये आलेल्या महापुराच्या ताडाख्यात झालेल्या जीवितहानीची नवी आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार, पूर आणि दरड कोसळल्याच्या घटनांमध्ये ४८३ जाणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण अद्यापही बेपत्ताच आहेत. तसेच या प्रलयामुळे झालेले नुकसान हे राज्याच्या वार्षिक खर्चाच्या रकमेपेक्षा अधिक आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी गुरुवारी दिली.

महाप्रलयानंतर केरळच्या विधानसभेत आज एक दिवसीय विशेष सत्र बोलावण्यात आले होते. यावेळी महापुरामुळे झालेल्या विध्वंसावर चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री विजयन म्हणाले, या शतकातील राज्याला बसलेला हा सर्वात वाईट फटका आहे. या महापूराचा फटका बसलेले १४.५० लाख लोक अजूनही मदत शिबिरांमध्ये आहेत. पूरामध्ये आणि दरड कोसळ्याच्या घटनांमध्ये ४८३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, १५ जण अद्यापही बेपत्ता आहेत.

ताज्या आकडेवारीनुसार, ५९,२९६ लोक ३०५ बचत शिबिरांमध्ये आहेत. ५७,००० हेक्टर जागेवरील शेती उद्धवस्त झाली आहे. या सर्व प्रलयामध्ये राज्याच्या वार्षिक खर्चापेक्षा अधिक किंमतीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या पावसाबाबत हवामान खात्याने आम्हाला वारंवार इशारा दिला होता. मात्र, पाऊसच इतक्या मोठ्या प्रमाणावर पडला की पुनर्वसनाच्या हालचाली करायलाही वेळ मिळाला नाही. ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या काळात राज्यात ९८.५० मिमी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, प्रत्यक्षात ३५२ मिमी इतका तुफान पाऊस पडला, असे विजयन यांनी सांगितले.

दरम्यान, एर्नाकुलम जिल्ह्यातील परवूर मतदारसंघाचे काँग्रेसचे वरिष्ठ आमदार व्ही. डी. सतीशन यांनी यावेळी सरकारवर कडाडून हल्ला केला. केरळात आलेली आपत्ती ही मानवनिर्मित आपत्ती असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, धरणांमधील पाण्याचे योग्य व्यवस्थापन न केल्याने ही परिस्थिती ओढवली. दरम्यान, अलाप्पुझा येथील कुथनंडू मतदारसंघातील आमदार थॉमस चंडी यांनी सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे पुरबाधितांना तातडीची प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत त्वरीत देण्यात यावी अशी मागणी केली.

यावेळी के. के. मनी म्हणाले, आता उद्धवस्त केरळची नवी घडी बसवताना नव्या केरळच्या निर्मितीसाठी बँकेमध्ये स्वतंत्र खाते खोलण्यात यावे. ओखी वादळाच्यावेळी अशाच प्रकारे राज्याला फटका बसला होता. त्यावेळी मुख्यमंत्री मदत निधीचा बराच गोंधळ झाला होता. त्यामुळे आता नवे खाते निर्माण करणे गरजेचे आहे.