केरळमधील पूर आता ओरसला असला तरीही तेथील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी काही काळ लागणार आहे हे नक्कीच. जवळपास महिनाभराच्या अतिवृष्टीनंतर केरळला महापुराचा तडाखा बसला. ज्यामध्ये अनेकांनी आपल्या डोक्यावरचं छतही गमावलं. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्याकडून ज्यावेळी मदतीचं आवाहन करण्यात आलं तेव्हा अनेकांनीच पुढे येत केरळला मदतीचा हात दिला. सैन्यदलापासून ते स्वयंसेवी संस्थांपर्यंत प्रत्येकानेच यात सहभाग घेतला. अशा या बचावकार्यात काही व्यक्ती त्यांच्या कामामुळे खऱ्या अर्थाने चमकून गेल्या. त्यातीलच एक नाव म्हणजे, मेजर हेमंत राज.

मेजर हेमंत राज हे ओणमच्या सुट्टीवर होते. मुख्य म्हणजे त्यांना सुट्टी मिळाल्यामुळे आणि ओणमचा सण केरळमध्ये साजरा करण्याची संधी मिळणार असल्यामुळे ते भलतेच आनंदात होते. पण, केरळमध्ये आलेलं संकट पाहून अखेर त्यांनी पुन्हा एकदा आपली कर्तव्यनिष्ठता दाखवत पूरग्रस्तांची मदत करण्याता निर्णय घेतला. कोचीला जाण्यासाठीचं विमान रद्द झाल्यानंतर त्यांनी तिरुवअनंतपूरम येथे जात निवृत्त सैनिक, विद्यार्थी आणि स्थानिक मासेमारांच्या साथीने एक गट करत केरळमधील पूरात अडकलेल्यांना मदतीचा हात दिला.

हेमंत राज हे भारतीय सैन्यदलातील २८ मद्रास सप्त शक्ती कमांडमध्ये मेजर या पदावर कार्यरत आहेत. यंदाच्या ओणम पर्वासाठी त्यांना सुट्टी मिळाली होती. १८ ऑगस्टपासून या पर्वाला सुरुवात झाली होती. त्याच दिवशी दिल्ली येथून कोचीला जाण्यासाठी त्यांचं विमान होतं. पण, केरळमध्ये पूर आल्यामुळे त्या विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं. ‘घरी जाऊन कुटुंबासोबत सण साजरा करण्यासाठी मी खुपच उत्सुक होतो. पण, तितक्यातच मला केरळमध्ये आलेल्या पुराची माहिती मिळाली. ज्यानंतर माझ्या विमानाचं उड्डाण रद्द झाल्यामुळे इंडिगो या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मी विनंती केली की मी केरळमध्ये जाऊन पूरग्रस्तांची मदत करु इच्छितो. तेव्हा त्यांनी १९ ऑगस्टला मला तिरुवअनंतपूरमला जाण्यासाठीच्या विमानाने जाण्याची परवानगी दिली, अशी माहिती त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. मुख्य म्हणजे केरळमध्ये आलेल्या या पूरात हेमंत राज यांचं कुटुंबही अडकलं होतं.

भारतीय वायूसेनेशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्या सहाय्याने राज अलाप्पुझा जिल्ह्यातील चेंगान्नूर या त्यांच्या गावात पोहोचले. जेथे पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. त्यानंतर तिथेच जवळ असणाऱ्या एका महाविद्यालयात असणाऱ्या मदत छावणीमध्ये त्यांना सोडण्यात आलं. पुढे त्यांनी १३ गढवाल रायफल्स या बचाव कार्यात सहभागी झालेल्या युनिटशी संपर्क साधला. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर बचावकार्यात भाषेमुळे अडचणी येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ज्यानंतर स्थानिक निवृत्त सैन्य अधिकारी आणि मासेमार त्यांच्या मदतीसाठी धावून आले.

‘मी जवळपास ३५ सेवानिवृत्त सैन्यदल अधिकाऱ्यांची एक टीम केली. ज्यामध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश होता. विद्यार्थी त्यांचे लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन आले होते, ज्यामुळे बचावकार्यात मदत झाली. ज्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी मदतीची गरज आहे अशा ठिकाणांचे पत्ते लिहून घेण्यास सुरुवात केली आणि पुढील मदत सुरु केली’, असं राज म्हणाले.

वाचा : Kerala Floods BLOG : ओणमच्या निमित्ताने साजरा होणार उत्सव माणुसकीचा, माणसातल्या देवाचा

जवळपास तीन दिवसांमध्ये राज आणि त्यांच्या संपूर्ण टीमने दर दिवशी १० टन खाद्यपदार्थ हवाई मार्गाने गरजूंपर्यंत पोहोचवले. यामध्ये त्यांना मदत झाली ती म्हणजे स्क्वाडरन लीडर अंशा यांची. विद्युतपुरवठा मध्येच खंडीत होत असल्यामुळे राज आणि त्यांची टीम पूर्णपणे मोबाईल आणि लॅपटॉपवर अवलंबून राहू शकत नव्हती. अखेर त्यांनी रेडिओ जॉकींची मदत घेण्याचं ठरवलं. यामध्ये त्यांना मदत झाली ती म्हणजे गायिका उषा उत्थुप यांची मुलगी आरजे, गायिका अंजली उत्थुप हिची मदत घेतली. समयसूचकता, हाताशी असलेल्या सोयीसुविधा आणि सामग्री आणि आपल्या पदाचं भान, जबाबदारी या सर्व गोष्टी लक्षात घेत हेमंत राज यांनी केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोलाचं योगदान दिलं आहे. सध्याच्या घडीला त्यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या राज्याचं झालेलं हे नुकसान भरुन काढण्यासाठी वेळ नक्कीच लागणार आहे. पण, तरीही या अडचणीवरही केरळवासिय मात करतील अशीच आशा ते करत आहेत.