केरळमध्ये पावसाचे थैमान मागील अनेक दिवसांपासून सुरु असून येथील जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत जवळपास ३५७ जणांचे या पूरामध्ये प्राण गेले असून अद्यापही हजारो जण या पूरात अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने आपला जीव वाचविण्यासाठी नागरिक जीवाचा अकांत करताना दिसत आहेत. नागरिकांना या परिस्थितीतून सुखरुप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या १६९ टीम काम करत आहेत. २२ हेलिकॉप्टर, नेव्हीच्या ४० बोटी, कोस्ट गार्डच्या ३५ बोटींच्या सहाय्याने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. याशिवाय स्थानिक तरुण, पोलीस यंत्रणा आणि काही सामाजिक संस्था यांची मदत मिळत आहे.

या बचावकार्यातील काही फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत. यामध्ये बचाव करणारे लोक आपला जीव कशापद्धतीने धोक्यात घालून हे कार्य करत आहेत ते दिसत आहे. यामध्ये वयस्कर लोकांपासून ते लहान मुलांपर्यंत अनेकांचे प्राण वाचविण्यात यश येत आहे. सुरक्षा जवान आपल्या प्राणाची चिंता न करता येथील नागरिकांसाठी देवदूताप्रमाणे धावून आले आहेत. शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत २० हजार नागरिकांची सुटका करण्यात आली. ९०० जणांना एअर लिफ्ट करण्यात आले. या घटनेचे व्हिडियो आणि फोटो भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल, भारतीय तटरक्षक दल, एनडीआरएफ, सीआरपीएफ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पोस्ट केले आहेत. हे व्हिडियो आणि फोटो अक्षरश: थक्क करणारे आहेत.

दरम्यान, भीषण पूर संकटाचा सामना करणाऱ्या केरळमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. केरळमधल्या १४ पैकी ११ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. फक्त तिरुअनंतपूरम, कोल्लम आणि कासारागॉड या तीन जिल्ह्यांना रेड अलर्टमधून वगळण्यात आले आहे. अन्न-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून देशाच्या वेगवेगळया भागातून केरळला अन्न-पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी केरळची हवाई पाहणी केल्यानंतर ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.