आठवडाभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं केरळमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राष्ट्रीय बचाव पथकांसोबत भारतीय नौदलाचे शेकडो जवान पुरग्रस्त भागात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. याच बचावकार्यादरम्यान १७ ऑगस्ट रोजी कोच्चीमधील अलवा येथे भारतीय नौदलाने दोन महिलांना हेलिकॉप्टरच्या साह्याने वाचवले. त्यामध्ये सुजीता जबेल या गर्भवती महिलेचाही समावेश होता. दोघींची सुटका केल्यानंतर नौदलाच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवत सुजीताला जवळच्या रूग्णालयात दाखल केले.

सुजीताला रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिचे ऑपरेशन केले. अन् सुजीताने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

सोशल नेटवर्किंगवर या बचाव कार्याचा व्हिडीओ तसेच सुजीता आणि तिच्या बाळाचे फोटो तुफान व्हायरल झाले. मात्र संकट टळल्यानंतरही जबेल कुटुंबिय नौदलाच्या जवानांच्या कार्याला विसरले नाहीत. स्वत:चा जीव धोक्यात टाकून सुजीता आणि तिच्या होणाऱ्या बाळाचा जीव वाचवणाऱ्या भारतीय नौदलाच्या जवानांना सुजीताच्या कुटुंबाने अनोख्या पद्धतीने धन्यवाद म्हटले आहे.

हॅलिकॉप्टरच्या मदतीने दोरीचा वापर करुन सुजीताला सुखरुप बाहेर काढणाऱ्या नौदलामधील पायलट विजय वर्मा आणि नौदलाच्या सर्वच जवानांच्या कार्याला धन्यवाद म्हणण्यासाठी जबेल कुटुंबाने त्यांच्या घराच्या गच्चीवर पांढऱ्या रंगाने Thanks असा एका शब्दाचा संदेश लिहीला आहे. अलवा येथून ज्या घराच्या छतावरून सुजीता आणि आणखीन एका महिलेला एअरलिफ्ट करण्यात आले त्याच छतावर हा संदेश लिहीण्यात आला आहे. सध्या इंटरनेटवर हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. या घराचे हॅलिकॉप्टरमधून काढलेले फोटो भारतीय नौदलाच्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करण्यात आले आहेत.

वेगळ्या पद्धतीने जवानांना धन्यवाद म्हणणाऱ्या जबेल कुटुंबियांचेही नेटकऱ्यांनी कौतूक केले आहे. मदतकार्यात व्यस्त असणाऱ्या भारतीय नौदलाच्या जवानांना आकाशातूनही दिसावे म्हणूनच अशाप्रकारे थेट छतावरच या पुरग्रस्तांनी Thanks अशी अक्षरे रंगवली आहेत.

त्या घराच्या छतावर हा संदेश लिहीण्यात आला आहे

हॅलिकॉप्टरमधून काढलेले फोटो

नौदलामधील पायलट विजय वर्मा

सुजीता जबेल आणि त्यांचे बाळ

लष्कर, नौदल व हवाईदलाच्या ५२ तुकड्या सध्या केरळमधील मदत कार्यात जुंपल्या असून अनेक अशासकीय संस्थाही मदतीसाठी सरसावल्या आहेत.