मुसळधार पावसामुळे पुराचा फटका बसलेल्या केरळला संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) ७०० कोटी रुपयांची मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी ही माहिती दिली.

केरळमध्ये ८ ऑगस्टपासून झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी या पुरात २२३ जणांचे प्राण गेले. तर सुमारे १० लाख लोकांना सुरक्षित स्थळी न्यावे लागले. या पुरात जवळपास २० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. याशिवाय केरळमधील पर्यटन व्यवसायालाही याचा फटका बसला असून जवळपास ८० टक्के पर्यटकांनी केरळमधील बुकिंग रद्द केले आहे. नैसर्गिक संकट ओढावलेल्या केरळला आता जगभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. शनिवारी यूएईचे पंतप्रधान आणि दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांनी केरळला मदत करण्यासाठी आपत्कालीन समिती तयार करण्याचे आदेश दिले होते. ‘यूएईच्या विकासात केरळमधील जनतेचे मोलाचे योगदान असून आता अशा कठीण प्रसंगात त्यांना मदत करणे ही आमची जबाबदारी आहे’, असे त्यांनी म्हटले होते. यासाठी पंतप्रधान मोदींनीही मक्तुम यांचे आभार मानले होते. यानंतर मंगळवारी यूएईने केरळला ७०० कोटी रुपयांची मदत करण्याची तयारी दर्शवली.  पूरग्रस्तांसाठी मदत निधी म्हणून हे पैसे दिले जातील, असे विजयन यांनी सांगितले.  दोन दिवसांपूर्वी केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यूएईतील भारतीय वंशांच्या व्यापारी आणि उद्योगपतींनीही १२.५ कोटी रुपये मदतीचे आश्वासन दिले होते.

दुसरीकडे केरळ सरकारने ३० ऑगस्ट रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्याची तयारी सुरु केली आहे. अधिवेशनात मदतकार्य, पुनर्वसन आणि पुनर्निमाण यावर चर्चा केली जाणार असून यासंदर्भातील शिफारस राज्यपालांना लवकरच केली जाईल, असे विजयन यांनी सांगितले. तसेच विजयन यांनी मंगळवारी सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याचेही म्हटले आहे.