15 December 2017

News Flash

तो ‘गाझा स्ट्रीट’ आता एनआयएच्या रडारवर

केरळमध्ये असलेल्या गाझा स्ट्रीटवरून आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: June 19, 2017 10:41 PM

केरळमधल्या तिरुअनंतपुरममध्ये असलेल्या कासरागोड महापालिकेने एका रस्त्याला गाझा स्ट्रीट असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता आत्ता चक्क NIA च्या अर्थात राष्ट्रीय गुप्तचर संस्थेच्या रडारवर आला आहे. इस्त्रायल आणि इजिप्तमधले अनेक वादग्रस्त संदर्भ गाझा स्ट्रीटसोबत जोडले गेले आहेत हे आपल्याला ठाऊक आहेच. तसेच आयसिस या दहशतवादी संघटनेच्या अनेक कारवायांचा आणि गाझा स्ट्रीटचा संबंधही आहेच. एवढेच नाही तर केरळमधून २०१६ या वर्षात सुमारे २१ तरुण या इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर या रस्त्याचे नाव वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.  हे नाव का देण्यात आले हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र गाझा स्ट्रीट असे नामकरण करण्यात आल्याने या रस्त्यावर आता गुप्तचर यंत्रणांची नजर असणार आहे.

या रस्त्यावरच जुम्मा मशिद आहे. तसेच गेल्याच महिन्यात थुरुथीतल्या या रस्त्याचे नामकरण गाझा स्ट्रीट असे करण्यात आले. मी या रस्त्याच्या उद्घाटन समारंभात सहभागी झालो नव्हतो. कारण हा रस्ता महापालिकेच्या अखत्यारीत येतो. कासरागोड महापालिकेनेच निधी उभा करुन या रस्त्याची पुनर्बांधणी केली आणि या रस्त्याचे नाव बदलले, या संदर्भात आपल्याला आधी काहीही कल्पना नव्हती असे जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष ए.जी.सी. बशिर यांनी म्हटले आहे. तर कासरागोडमधल्या या रस्त्याबाबत आपल्याला माहिती आहे मात्र त्याचे नाव गाझा स्ट्रीट असे कधी ठेवले गेले हे माहिती नाही असे महापालिकेच्या अधिकारी बिफातिमा इब्राहिम यांनी म्हटले आहे. या दोघांनी रस्त्याच्या नावाबाबत कानावर हात ठेवलेले असताना, भाजप नेत्यांनी मात्र जाणीवपूर्वक रस्त्यांची आणि स्थळांची नावे बदलली जात आहेत असा आरोप केला आहे.

या रस्त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद निर्माण झालेला असला तरीही, आता कासरागोड हा जिल्हा आणि गाझा स्ट्रीट हा रस्ताच एनआयएच्या रडारवर आला आहे. कासरागोड जिल्ह्यातल्या या घटनेकडे आमचे लक्ष गेले नाही, मात्र आता छोट्यातल्या छोट्या घटनेवर आम्ही लक्ष ठेवून राष्ट्रीय गुप्तचर संस्थेला सहाय्य करणार आहोत असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

First Published on June 19, 2017 10:41 pm

Web Title: keralas gaza street on the radar of ib nia