ज्याप्रमाणे प्रत्येक राज्यामध्ये कल्याणकारी कामे करणाऱ्या स्वयंसेवी संस्था असतात त्याचप्रमाणे खाप पंचायतीही आहेत. खाप पंचायती या हरयाणा राज्याच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत, अशी मुक्ताफळे मुख्यमंत्री भुपिंदर सिंग हुडा यांनी उधळली. काही दिवसांपूर्वीच, केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांनी ‘खाप पंचायती हा भारतीय संस्कृतीचा घटकच नाहीत,’ असे विधान केले होते. त्या पाश्र्वभूमीवर, काँग्रेस पक्षाच्याच मुख्यमंत्र्यांनी ‘खाप पंचायतींना राज्य संस्कृतीचा घटक ठरविल्याने’ अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी असिमानंदांची मुलाखत, खाप पंचायत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा अनेक मुद्दय़ांवरून पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. अंबाला तुरुंगात असिमानंद यांची मुलाखत घेण्याची परवानगी नियतकालिकाच्या पत्रकारांनी घेतली होती का, या प्रश्नाचे उत्तर देताना हुडा यांनी ‘तुरुंग प्रशासनाने योग्य त्या परवानग्या नक्कीच दिल्या असतील, विशेषत: वकिलांना अशी परवानगी दिली असेल, असे संदिग्ध उत्तर दिले. पण सदर नियतकालिकाने सलग दोन वर्षे असिमानंद यांना आपला पत्रकार प्रतिनिधी अंबाला तुरुंगात भेटत होता, असा दावा केला आहे, हे विशेष.
येत्या ११ तारखेला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गणौर येथे शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी येणार आहेत, अशी माहितीही हुडा यांनी दिली. येत्या १७ तारखेपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही संपूर्ण अर्थसंकल्पच सादर करणार आहोत, लेखानुदान मांडले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.