पॅराडाइज पेपर्स घोटाळ्यात परदेशात आर्थिक गुंतवणूक करण्यात सन ग्रुपचे नंदलाल खेमका हे आघाडीवर असल्याचे नवीन कागदपत्रातून स्पष्ट होत आहे. अ‍ॅपलबायच्या नोंदीनुसार सन समूहाची शंभरहून अधिक आस्थापनात गुंतवणूक असून रशियात खाण, पायाभूत सुविधा व हवाई क्षेत्रात त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. न्यूजर्सी व ब्रिटिश व्हर्जिन आयलंड येथे त्यांनी १०० आस्थापनांची नोंदणी केली असून त्यातील १७ संस्थांत खेमका यांचे नाव लाभार्थी म्हणून आले आहे. त्यांचा मुलगा शिव विक्रम हा १०४ आस्थापनात तर उदय हर्ष खेमका हा दुसरा मुलगा १०२ आस्थापनात अधिकारी असल्याचे दाखवण्यात आले आहे. यात नंद अँड जित फाउंडेशन ही प्रमुख संस्था आहे.  नंद व त्यांची पत्नी जीत यांच्या या संस्थेची सेंट हेलर, जर्सी व अ‍ॅपलबाय ट्रस्ट तसेच बर्कलेज प्रायव्हेट क्लायंट इंटरनॅशनल लिमिटेड, डॉइश बँक येथे खाती व गुंतवणूक आहे.

सन एनर्जी इंटरनॅशनल,सन एनर्जी रिसोर्सेस लिमिटेड, सन सिक्युरिटीज लिमिटेड, सन ट्रेड इंटरनॅशनल लिमिटेड टॅक्टीटस लिमिटेड, द अँगस ट्रस्ट, द अशोका ट्रस्ट, द चेकोव्ह युनिट ट्रस्ट यांच्यामार्फत त्यांनी व्यवहार केले आहेत. खेमका फाउंडेशनने पेनसिल्वानिया विद्यापीठास ६ लाख पौंड दिले होते, तर २००७ मध्ये खेमका यांना १८ दशलक्ष डॉलर्स मिळाले होते. त्यातून त्यांनी भारतात मालमत्ता खरेदी केली. त्यांनी २.४ दशलक्ष युरो खर्च करून किमती कलावस्तू खरेदी केल्याची नोंद अ‍ॅपलबायकडे आहे.

खेमका यांनी सांगितले, की गेली पस्तीस वर्षे माझी दोन्ही मुले अनिवासी भारतीय आहेत . सन समूहाची खासगी गुंतवणूक असून तीस वर्षांपासून जगभरात व्यवहार आहेत. मी सुद्धा अनिवासी भारतीय असून सर्व नियम व कायद्यांचे पालन केलेले आहे. पण मालमत्ता व कलावस्तू खरेदी ही मी केली असेल तर ती व्यक्तिगत निधीतून केलेली आहे.

हिंदुजा समूहाची ट्रस्टच्या माध्यमातून मोठी कर्जमाफी

हिंदुजा बंधूपैकी काही जण जगात सर्वशक्तीशाली उद्योजकांपैकी आहेत पण हिंदूजा समूहाचा महसूल २.५ अब्ज डॉलर्स असून एक लाख कर्मचारी तेथे काम करतात. या समूहाने ट्रस्ट रचनेच्या माध्यमातून त्यांच्या समूहातील होल्डिंग कंपनीचे ७८ दशलक्ष डॉलर्सचे कर्ज माफकरून घेतले.याचा फायदा हिंदुजा कुटुंबातील व्यक्तींना होणार आहे, याकडे विश्वस्तांनी लक्ष वेधूनही हा मार्ग वापरण्यात आला, असे अ‍ॅपलबायच्या नोंदीवरून दिसून येत आहे. सुरूवातीला होल्डिंग कंपनीच्या या व्यवहाराच्या खात्यांवर स्वाक्षरी करण्यास विश्वस्तांनी नकार दिला, पण प्रकाश हिंदुजा यांच्याकडून भरपाई बंधपत्र घेतल्यानंतर मात्र स्वाक्षरी करण्यात आली. नोंदीनुसार कर्जाची कागदपत्रे ३० जून २००७ व ३ डिसेंबर २००७ दरम्यानची असून हिंदुजांच्या ट्रस्टने कर्जमाफी दिल्यानंतर लक्झेमबर्ग येथील एएमएएस होल्िंडग कंपनी नफ्यात आली. त्यांच्या अ‍ॅकॉर्न ट्रस्टचे सीएचएफमध्ये १० हजार शेअर्स आहेत. प्रकाश हिंदुजा हे मुंबईत जन्मले असले तरी ते स्विस नागरिक आहेत. ते मोनॅकोचे कर रहिवासी आहेत. श्रीचंद व गोपीचंद हे ब्रिटनचे नागरिक आहेत. अशोक हे भारतीय नागरिक आहेत. हिंदुजा बंधूच्या या सगळ्या बाबींबाबत अ‍ॅपलबायने अनेक शंका व्यक्त केल्या आहेत. अशोक लेलँड या कंपनीचे तेल, वीज, बँकिंग व इतर क्षेत्रात हितसंबंध आहेत. या कंपनीने इंडियन एक्स्प्रेसच्या प्रतिसाद प्रश्नावलीला उत्तर दिलेले नाही.