दिल्लीत हिंसक जमावाच्या हल्ल्यातून बचावलेल्या शबाना परवीन (३०) या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. शबाना यांनी मुलाला जन्म देणे हे कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नाही. आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. उत्तर पूर्व दिल्लीत मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला. हिंसक झालेल्या जमावाने अनेक दुकानांची जाळपोळ केली. घरे उद्धवस्त केली. उत्तर पूर्व दिल्लीतील करावल नगरमध्ये रहाणाऱ्या शबाना आणि तिच्या नवऱ्याला जमावाने मारहाण केली.

हिंसक झालेल्या जमवाने मारहाण करतान शबाना यांना लाथाही मारल्या. जमावाने त्यांच्या घराला आग लावली. परवीन त्यांचे पती, दोन मुले आणि सासू घरामध्ये झोपलेले असताना सोमवारी रात्री जमावाने त्यांच्या घरावर हल्ला केला. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- दिल्ली हिंसाचार : नाव सांगितलं अशफाक; छातीत घातल्या पाच गोळ्या

“ते धार्मिक घोषणाबाजी करत होते. माझ्या मुलाला मारहाण केली. माझी सून गर्भवती असतानाही तिच्या पोटात लाथा मारल्या. मी तिला वाचवायला गेले तर, त्यांनी मला सुद्धा मारहाण केली. आम्ही आता वाचणार नाही असेच त्या रात्री वाटले. पण सुदैवाने देवाच्या कृपेने आम्ही बचावलो. आम्ही लगेच परवीनला जवळच्या रुग्णालयात नेले. तिथे तिने मुलाला जन्म दिला” असे परवीनची सासू नशिमा यांनी सांगितले.