“आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताचा पाया नष्ट करू देणार नाही.. त्यांना हे समजत नाही की तामिळनाडूचं भविष्य केवळ तामीळ जनताच ठरवू शकते. नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत.” असं म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भर सभेतून पंतप्रधान मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला.

तामिळनाडूमध्ये मे महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राहुल गांधींच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. याचबरोबर राज्यातील राजकीयव वातावरण देखील हळूहळू तापायला सुरूवात झाली आहे. राहुल गांधी सध्या तामिळनाडू दौऱ्यावर असून, विविध ठिकाणी रोड शो व सभांद्वारे ते भाजपावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

धारमपुर येथील एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मन की बात कार्यक्रमावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला, “तामिळनाडूमध्ये असं सरकार हवं आहे की जे लोकांच्या समस्या सोडवेल, ना की स्वतःची मन की बात जनतेवर थोपवेल. तसेच, पंतप्रधान मोदींच्या राजकारणाने भारताचं अधःपतन होतंय, हे आता आपल्याला थांबवायला हवं. मोदींना भारताचा पायाच नष्ट करायचा आहे. आपण सर्वजण मिळून मोदींच्या राजकारणाविरोधात लढा देऊ” असं देखील राहुल गांधी यांनी तामिळनाडूमधील जनतेला आवाहन केलं आहे.

आणखी वाचा- दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर काँग्रेस खासदारावर प्राणघातक हल्ला; पगडीही खेचण्यात आली

तसेच, “मी इथं तुम्हाला हे सांगायला आलेलो नाही की, तुम्हाला काय करायचं आहे. मी तुमच्याशी मन की बात करण्यास देखील आलेलो नाही. मी इथं तुम्हाला ऐकण्यासाठी आलो आहे. तुमच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आलो आहे व त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आलो आहे.” असं देखील राहुल गांधी म्हणाले आहेत.