कोलकाता येथे मेट्रो ट्रेनमध्ये मिठी मारणाऱ्या एका युगूलाला जमावाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. सोमवारी ही घटना घडली असून काही सहप्रवाशांनी धाडस दाखवत त्या जमावाच्या तावडीतून युगूलाची सुटका केली.
कोलकाता येथील खासगी कंपनीत काम करणारा तरुण तिच्या मैत्रिणीसह मेट्रो ट्रेनने जात होता. प्रवासादरम्यान त्यांनी एक- दोनदा मिठी मारली. यावरुन मेट्रोमधील काही प्रवासी आक्रमक झाले. त्यांनी थेट त्या युगूलाला मारहाण केली. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी मिठी मारण्याऐवजी बागेत किंवा पबमध्ये का जात नाही, तुम्ही हॉटेलमध्ये खोली का बुक करत नाही, असे प्रश्न त्यांना वारंवार विचारले जात होते.
डमडम मेट्रो स्थानकात या युगूलाला खाली उतरवण्यात आले. यानंतरही त्यांना मारहाण करण्यात आली. जमावाने तरुणाला मारहाण केली. तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीसोबतही असभ्य वर्तन करण्यात आले. दुसऱ्या डब्यातील काही प्रवाशांनी शेवटी त्या युगूलाची मदत केली. त्यांनी त्या युगूलाला जमावातून बाहेर काढले.
मी गेली अनेक वर्ष कोलकात्यात राहतोय. पण हा प्रकार धक्कादायक असून कोलकात्यात अशी घटना घडेल यावर माझा विश्वासच बसत नाही. माझी मैत्रीण खूप दिवसांनी पाटण्याहून कोलकात्यात आली होती. तिची पाटण्याला बदली झाली होती. पण सोमवारी घडलेल्या प्रसंगाने आमच्या आनंदावर पाणी फेरले, असे त्या तरुणाने सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2018 4:45 pm