प. बंगालमध्ये हिंदू कुटुंबाकडून धार्मिक ऐक्याचा आदर्श

कोलकाता : सध्या सुरू असलेल्या दुर्गापूजा उत्सवात पश्चिम बंगालमधील एका कुटुंबाने कुमारी पूजेच्या विधीत ४ वर्षांच्या मुस्लीम मुलीची पूजा करून धार्मिक ऐक्याचा आदर्श घालून दिला.

उत्तर २४ परगणा जिल्ह्य़ातील अर्जुनपूर येथील दत्त कुटुंबाने रविवारी महाअष्टमीनिमित्त उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील फातिमा या मुलीची पूजा केली.

महाअष्टमीचा भाग असलेल्या कुमारी पूजेच्या विधीत किशोरावस्थेपूर्वीच्या मुलींची दुर्गामातेचे रूप म्हणून पूजा करण्यात येते. परंपरेनुसार, केवळ ब्राह्मण मुलींचीच ‘कुमारी’ म्हणून पूजा केली जाते.

दत्त कुटुंब २०१३ पासून त्यांच्या घरी दुर्गापूजा साजरी करते, मात्र या वर्षी ‘सर्वसमावेशकता आणि धार्मिक ऐक्याचा’ संदेश देण्यासाठी त्यांनी परंपरेपासून फारकत घेण्याचे ठरवले.

‘‘पूर्वी आम्ही केवळ ब्राह्मण मुलींची कुमारी म्हणून पूजा करीत असू. मात्र माँ दुर्गा ही पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्यप्राण्याची आई आहे. त्यामुळे आम्ही ही परंपरा मोडली,’’ असे स्थानिक नगरपालिकेत अभियंते असलेले तमल दत्त यांनी सांगितले. पूर्वी आम्ही एका ब्राह्मणेतर मुलीची पूजा केली होती आणि या वेळी आम्ही एका मुस्लीम मुलीचे पूजन केले, असे ते म्हणाले.

मुस्लीम मुलीची पूजा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दत्त कुटुंबापुढे अशी मुलगी शोधण्याचे अवघड काम होते. त्यामुळे तमल यांनी त्यांचे सहकारी मोहम्मद इब्राहिम यांची मदत मागितली. इब्राहिम यांनी आग्रा येथे आपल्या पालकांसोबत राहणारी त्यांची भाची फातिमा हिचे नाव सुचवले, तसेच आपली बहीण व मेहुणे यांचीही यासाठी परवानगी मिळवली. अद्याप शाळेत जाऊ न लागलेली फातिमा व तिची आई यांनी या उत्सवासाठी दत्त कटुंबात मुक्काम केला होता. असे असले तरी मुस्लीम मुलीचे कुमारी पूजन करणे ही गोष्ट नवी नाही. स्वामी विवेकानंद यांनी १८ ऑगस्ट १८९८ रोजी खीर भवानी मंदिरातील कार्यक्रमात एका चार वर्षांच्या काश्मिरी मुस्लीम मुलीची पूजा केली होती. त्यांनीच स्थापन केलेल्या रामकृष्ण मठाचे जागतिक मुख्यालय असलेल्या बेलूर मठात, समाजात महिलांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी १९०१ साली त्यांनी कुमारी पूजा सुरू केली.