शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात सीबीआयच्या चौकशीमुळे चर्चेत आलेले कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची बदली करण्यात आली आहे. ‘सीएनएन न्यूज 18’ ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. सीआयडी अर्थात राज्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेत राजीव कुमार यांना पाठवण्याची शक्यता आहे.

राजीव कुमार यांच्याकडे सीआयडीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाचा पदभार दिला जाण्याची शक्यता आहे. या वृत्तानुसार, राजीव कुमार यांच्यानंतर अनुज शर्मा हे कोलकाता शहराचे नवे पोलीस आयुक्त असू शकतात. नियमानुसारच कुमार यांची बदली झाल्याचंही या वृत्तात म्हटलंय.

काही दिवसांपूर्वी शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात सीबीआयचे एक पथक कोलकाता येथे राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी कोलकात्याच्या स्थानिक पोलिसांनीच सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. सीबीआय अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त काही वेळातच पसरलं आणि देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यानंतर केंद्र सरकार जाणूनबुजून लक्ष्य करत असल्याचं सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर तुफान टीका केली आणि कारवाईविरोधात धरणे आंदोलनही केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राजीव कुमार यांना अटक करण्यास मनाई केली पण चौकशीसाठी सीबीआयच्या शिलाँग येथील मुख्यालयात त्यांना उपस्थित व्हावं लागलं होतं. अखेर आता राजीव कुमार यांची बदली झाली आहे.