वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे. जितके देखणे तितकेच प्रेमळ. आईवर त्यांचा प्रचंड जीव होता. आईच्या ८३ व्या वाढदिवसाला अचानक नागपूर गाठून तिला आश्चर्याचा धक्का देण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठीची सर्व तयारी त्यांनी करून ठेवली होती. परंतु शनिवारी नागपुरात पोहोचण्याआधीच शुक्रवारी केरळमधील कोझिकोड विमान दुर्घटनेत दीपक साठे यांचा मृत्यू ओढवला.

काही दिवसांपूर्वी दीपक यांनी नातेवाईकांना आईच्या वाढदिवसाला नागपुरात येणार असल्याचे सांगितले होते. मी येणार असल्याची कल्पना आईला देऊ नका. मी अचानक तिच्यासमोर अवतरेन, असे त्यांनी नातेवाईकांना सांगितले होते. परंतु हा योग काही आलाच नाही. कॅ. दीपक साठे यांचा जन्म नागपुरात झाला. ते सध्या मुंबईत स्थायिक झाले होते. त्यांची पत्नी सुष्मा साठे या देखील मुंबईला असून त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा शंतनू अमेरिकेत असून त्याचे गेल्या ११ मार्च रोजी लग्न झाले तर दुसरा मुला धनंजय बेंगरुळु येथे आहे.

कॅ.साठे यांनी टाळेबंदीपूर्वी मुलाचे लग्न मुंबईत झाल्यानंतर नागपुरातील नातलगांसाठी एक पार्टी ठेवली होती. तीच त्यांची नागपूरची अखेरची भेट ठरली. कॅ.साठे यांची वहिणी सुवर्णा सांगतात,  त्यांचे आई-वडील नागपुरात असल्याने त्यांची एकतरी फेरी नेहमी व्हायची. शुक्रवारी रात्री त्यांच्या निधनाची बातमी कळली.

धोकादायक धावपट्टीबाबत कुटुंबीयांना माहिती

भारतात  जेथे टेबलटॉप धावपट्टी आहे अशा ठिकाणी विमान उतरवणे फार कठीण असते असे कॅ.साठे यांनी कुटुंबीयांना सांगितले होते. अनेकदा विमान घसरण्याची भीती असते. विशेष म्हणजे, केरळमधील ज्या करिपूर विमानतळावर त्यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले, ती धावपट्टी देखील घातक आहे, असे त्यांनी आधीच  सांगितले होते, अशी माहिती त्यांची वहिणी सुवर्णा साठे यांनी दिली.