देशातील रेल्वे स्थानकांवर यापुढे प्लास्टिक व कागदी कपांऐवजी पारंपरिक तसेच पर्यावरणस्नेही कुल्हड (मातीचे भांडे) चहा देण्यासाठी वापरले जातील, अशी घोषणा रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.

राजस्थानातील अल्वर जिल्ह्य़ात धिगवारा रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, रेल्वे स्थानके प्लास्टिकमुक्त करण्यात येतील. चहा आता कुल्हडमधून दिला जाईल. आजपासूनच ही योजना सुरू होत आहे. रेल्वेचे प्लास्टिकमुक्त भारतासाठी हे मोठे योगदान असेल. कुल्हडमधील चहाची चव वेगळी असते असा अनुभव आपण आताच घेतला आहे. कुल्हडमुळे पर्यावरणाची हानी होत नाही व लाखो लोकांना त्यामुळे रोजगार मिळतील असे त्यांनी सांगितले. धिगवारा -बांदीकुई भागातील विद्युतीकरणाचे उद्घाटन गोयल यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी २०१४ मध्ये केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी राजस्थानातील रेल्वे विभागाकडे दुर्लक्ष झाले होते. दिल्ली-मुंबई मार्गाचे विद्युतीकरण झाल्यानंतर तीस वर्षे राजस्थान रेल्वेकडे कुणी लक्ष दिले नाही.