केंद्र सरकारनं निर्गुंतवणुकीचं धोरण स्वीकारत एकापाठोपाठ एक कंपन्यांचं खासगीकरण सुरू केलं आहे. सरकारी कंपन्याबरोबरच हवाई वाहतूक क्षेत्रातील केंद्राची कंपनी असलेल्या एअर इंडियाचंही खासगीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एअर इंडियासंदर्भात बोलताना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी वर्षभरात खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल, असं सांगितलं. त्यावरून कवी कुमार विश्वास यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे.

एअर इंडियाच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेसंदर्भात बोलताना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, “मी मनापासून सांगतो की, सरकारनं विमानतळ चालवायला नको. त्याचबरोबर हवाई वाहतूक कंपनीही चालवायला नको,” असं ते म्हणाले. केरळमध्ये विमानतळाच्या खासगीकरणाला विरोध होत असल्यानं त्यांनी ही भूमिका मांडली होती.

आणखी वाचा- तुम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न होतोय; राहुल गांधींचं देशवासीयांना एकजुट होण्याचं आवाहन

हरदीप सिंग पुरी यांच्या याचं विधानावरून कवी कुमार विश्वास यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “हो, अगदी बरोबर. जेव्हा सर्व शक्तिमान असा देवच आपला देश चालवत आहे. तेव्हा आपण राष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय रेल्वे, राष्ट्रीय बंदरे (पोर्ट), विद्यापीठं, राष्ट्रीय महामार्ग, रुग्णालये, वीज कंपन्या हे आणि इतर सर्व कशासाठी चालवायला हव्यात? खरंतर सरकारनं स्वतःच सरकारही चालवायला नको. भारत माता की जय,” असं म्हणत कुमार विश्वास यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.

आणखी वाचा- NEET/JEE दिवाळीनंतर घ्या, स्वामींचं पंतप्रधान मोदींना साकडं

तोट्यात असलेल्या एअर इंडियाची विक्री करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल आहे. यापूर्वी एअर इंडियाचा लिलाव करण्यात आला होता. मात्र, योग्य बोली न लागल्यानं प्रक्रिया रखडली होती. सरकारनं पुन्हा एकदा लिलाव प्रक्रिया सुरू केली. पण करोनामुळे ती ठप्प झाली आहे.