पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेजवळील स्थिती अजूनही सामान्य झालेली नाही. तिथे तणाव कायम आहे. मुत्सद्दी आणि लष्करी पातळीवरील चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतरही चिनी सैन्य पूर्णपणे मागे हटलेलं नाही. पुढे कॉर्प्स कमांडरची बैठक होणार की, नाही याबद्दलही अनिश्चितता आहे. चीन बरोबर दीर्घकाळ ही तणावाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने भारतीय लष्कराने आतापासूनच तयारी सुरु केली आहे.

कदाचित हिवाळयापर्यंत ही स्थिती अशीच राहू शकते. पूर्व लडाखसारख्या उंचावरील क्षेत्रामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये पहारा देणे सोपे नाही. कडाक्याच्या थंडीमध्ये ड्युटी बजावताना भारतीय सैन्याला विशेष कपडे, शेल्टर्स, तंबू, इंधन आणि अन्य साहित्याची आवश्यकता भासणार आहे. पूर्व लडाखमध्ये तैनात असलेल्या जवानांसाठी पुरेसे धान्य आणि अन्य आवश्यक साहित्य पुरवण्याची प्रक्रिया भारतीय सैन्याने सुरु केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

पँगाँग टीएसो आणि हॉट स्प्रिंग-गोग्रामधून अजूनही चिनी सैन्याने पूर्णपणे माघार घेतलेली नाही. “लडाखमध्ये तैनात असणाऱ्या सैन्यासाठी वर्षाला एकूण ३० हजार मेट्रीक टन रेशनची गरज लागत असेल, तर आता दुप्पट रेशनची गरज लागणार कारण तिथे अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात केल्या आहेत” असे एका वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्याने सांगितले.

“चीन लगेच मागे हटणार नाही. त्यामुळे आम्ही पद्धतशीरपणे दीर्घकाळाच्या दृष्टीने तयारी करत आहोत. हिवाळयात लागणाऱ्या आवश्यक साहित्याचा स्टॉक करुन ठेवणे सुद्धा सुरु आहे” असे या अधिकाऱ्याने सांगितले. “चीनने कुठलीही आगळीक करु नये, यासाठी हिवाळयातही फॉरवर्ड भागांमध्ये मोठया प्रमाणावर सैन्य ठेवावे लागेल” असे या अधिकाऱ्याने सांगितले.

नौदलाच्या मिग-२९के फायटर विमानांची एअर फोर्सच्या तळावर तैनाती
पूर्व लडाखमध्ये अजूनही तणावाची स्थिती कायम आहे. त्यामुळे भारतीय नौदलाकडून उत्तरेकडील इंडियन एअर फोर्सच्या महत्त्वाच्या तळांवर मिग-२९के फायटर विमानांची तैनाती सुरु आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात ४० पेक्षा जास्त मिग-२९के विमाने आहेत. त्यात १८ विमाने आयएनएस विक्रमादित्य या एकमेव विमानवाहू युद्धनौकेवर तैनात आहेत. उर्वरित मिग-२९ के विमाने गोवा येथील नौदलाच्या बेसवर असतात.

ही मिग-२९ के विमाने मूळची रशियन बनावटीची आहेत. गोव्यातील नौदलाच्या बेसवरुन काही विमाने उत्तरेकडील इंडियन एअर फोर्सच्या तळावर हलवली आहेत. चीन सीमेवरील स्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.