लडाखमध्ये शहीद झालेले दीपक कुमार सिंह यांना काही दिवसांपूर्वी फोनवरुन आपल्या आजीशी बोलताना लॉकडाउन संपल्यानंतर घरी येईन असा संदेश दिला होता. पण नातसोबतचा हा आपला शेवटचा संदेश असेल असं त्यांना अजिबात वाटलं नव्हतं. लडाखमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या २० भारतीय जवानांमध्ये दीपक कुमार सिंह यांचाही समावेश आहे. सात महिन्यांपूर्वीच दीपक यांचं लग्न झालं होतं.

“लॉकडाउन संपल्यानंतर मी घरी येईन,” असं ३० वर्षीय दीपक कुमार सिंह यांनी आजी फूलकुमारी यांच्याशी बोलताना म्हटलं आहे. दीपक कुमार यांच्या निधनाची माहिती मिळताच कुटुंबासह संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. दीपक कुमार हे मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील रहिवासी होते.

“काही दिवसांपूर्वीच माझं आणि दीपकचं बोलणं झालं होतं. त्यावेळी त्याने लॉकडाउन संपला की सुट्टी घेऊन घरी येईल असं सांगितलं आहे. पण लॉकडाउन संपायला आला असतानाच आमच्याकडे त्याच्या निधनाची माहिती आली,” अशा भावना फूलकुमारी यांनी पीटीआयशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.

दीपक यांच्या आईचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. तेव्हापासून फूलकुमारीच आपल्या नातवाची काळजी घेत होत्या. “तो खूप प्रेमळ होता. घरातील प्रत्येकाचा तो आदर करायचा. प्रत्येकाला तो आवडत होता,” असं सांगताना फूलकुमारी यांना अश्रू अनावर होत होते.

दीपक यांच्या निधनाची माहिती मिळाल्यापासून गावात शोककळा पसरली असल्याचं कुटुंबाने सांगितलं आहे. दीपक यांचं पार्थिव गुरुवारपर्यंत गावात पोहोचेल अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे. दीपक २०१३ मध्ये लष्करात भरती झाले होते. बिहार रेजिमेंटसोबत त्यांना गलवान खोऱ्यात तैनात करण्यात आलं होतं. दीपक यांचे वडील शेतकरी असून भाऊ प्रकाशदेखील लष्करात आहे.