५२ वर्षीय पत्रकार बबिता बासू या रविवारी आपल्या नोएडा येथील घरात मृत आढळून आल्या. गेल्या काही दिवसांपासून त्या डायलिसिसवर होत्या असे सांगण्यात येते. बबिता यांचा तीन आठवड्यांपूर्वीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. बबिता या नोएडा येथील १६ मजली इमारतीतील फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या.

बबिता यांचा मुलगा गेल्या ५ वर्षांपासून बेंगळुरु येथे राहतो. तो तेथील एका खासगी कंपनीत कामाला आहे. घर मालक अरुण सठिजा भाडे करार नूतनीकरण करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी फोनही केला, पण तोही उचलला नाही. अरुण यांना घरात दुर्गंधी सुटल्याचे लक्षात आले. त्यांनी बबिता यांचा बेंगळुरुतील मुलाला फोन केला. मुलगा रविवारी नोएडात परतला. पोलीस व शेजाऱ्यांच्या उपस्थितीत दरवाजा तोडला. त्यावेळी बबिता यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.

बबिता यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वेबसाइटसाठी काम केलेले आहे. किडनी डोनरच्या शोधासाठी त्यांनी मागीलवर्षी चेन्नई येथे भेट दिली होती. शेजारच्यांनाही बबिता यांना काय झाले आहे, याची माहिती नव्हती. सकृतदर्शनी बबिता यांचा २० ते २५ दिवसांपूर्वी नैसर्गिक मृत्यू झाल्याचे दिसते, असे सेक्टर ३९ पोलीस ठाण्याचे अधिकारी अमितकुमार सिंह यांनी सांगितले.