अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी प्रशासनाचे पथक दाखल होते, तेव्हा नागरीकांना आपण दगडफेक किंवा ठिय्या मांडून विरोध करताना पाहिले आहे. पण राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील मांडावाला गावच्या महिला सरपंचाची विरोधाची पद्धत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

मांडावाल गावच्या महिला सरपंच रेखा देवी यांनी अतिक्रमण विरोधी मोहिम रोखण्यासाठी थेट पाडकामासाठी आणलेल्या जेसीबी मशिनवर चढण्याचा प्रयत्न केला. रेखा देवी यांच्या विरोधाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये रेखा देवी या जेसीबी मशिनवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसतात. काही क्षणांसाठी त्या जेसीबीला पकडून लटकल्याही होत्या. त्यांच्यासोबत असलेल्या गावकऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. सरपंचांच्या अशा प्रकारच्या तीव्र विरोधामुळे अखेर अतिक्रमण विरोधी मोहिम थांबवावी लागली. माझ्या अंगावर जेसीबी चढवण्याचा प्रयत्न झाला. माझ्या गाडीवरही जेसीबी घालण्याचा प्रयत्न झाला असा रेखा देवींचा आरोप आहे. स्थानिकांनी या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केले. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.