चारा घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय शनिवारी दिला. मात्र मी भाजपच्या राजकारणाचा बळी ठरलो अशी टीका आता लालूप्रसाद यादव यांनी केली. चारा घोटाळा २१ वर्षांपूर्वीचा आहे. मात्र या घोटाळ्यात मला नाहक गोवण्यात आले आहे असा आरोप आता लालूप्रसाद यादव यांनी केला.

या शिक्षेविरोधात लालूप्रसाद यादव जामीन मिळवण्यासाठीही अर्ज करू शकत नाहीत असेही सीबीआयच्या विशेष न्यायालयाने म्हटले आहे. माझ्या वयाचा विचार करता मला कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती लालूप्रसाद यादव यांनी केली होती. मात्र लालूप्रसाद यादव यांना साधारण सात वर्षांची शिक्षा सुनावली जाईल असा अंदाज काही कायदेतज्ज्ञांनी वर्तवला होता. लालूप्रसाद यादव यांच्या विनंती अर्जाचा विचार करत कोर्टाने त्यांना साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच लालूप्रसाद यादव जामिनासाठी अर्ज करू शकत नाहीत असेही म्हटले. आता मात्र लालूप्रसाद यादव यांनी मला भाजपने या सगळ्या प्रकरणात अडकवले असा आरोप केला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मी बिहारच्या जनतेच्या हितासाठी प्रयत्न करत होतो मात्र जनता दल आणि भाजपला ते बघवले नाही त्यामुळे माझ्याविरोधातली जुनी प्रकरणे खोदून बाहेर काढण्यात आली. मला या सगळ्या प्रकरणांमध्ये नाहक गोवण्यात आले असा आरोप आता लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. तर लालूप्रसाद यादव यांना जामीन मिळावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांचा मुलगा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केले आहे. आता लालूंच्या या नव्या आरोपाला नितीशकुमार किंवा भाजपकडून काही प्रत्युत्तर दिले जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.