आगामी निवडणुकीत आघाडीचे संकेत
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेऊन आगामी राजकीय समिकरणांबाबत चर्चा केली. या वेळी लालूंनी २००९ मध्ये काँग्रेसबरोबरची आघाडी तोडण्याच्या निर्णयाबाबतही खेद व्यक्त केला. तसेच पुन्हा अशी चूक करणार नसल्याचे सांगत आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा आघाडीबाबत उत्सुक असल्याचे संकेत लालूंनी दिले.
सुमारे १० मिनिटे चर्चा केल्यानंतर सोनिया गांधी यांनी लवकरच पून्हा भेटू आणि आघाडीबाबत चर्चा करू, असे आश्वासन दिल्याचे लालूप्रसाद यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की,  बिहार, झारखंड आणि इतर ठिकाणी धार्मिक शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस-राजद आणि लोकजनशक्ती पक्षाची आघाडी करण्याबाबत आपण आशावादी आहोत. तसेच नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा राहुल गांधी यांचे नेतृत्व अधिक चांगले असल्याचे यादव यांनी सांगितले.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत राजद, लोकजनशक्ती पक्ष यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. त्याचा परिणाम राजदला केवळ चारच जागांवर समाधान मानावे लागले होते तर लोकजनशक्तीला खातेही उघडता आले नव्हते आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या.