एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सुप्रिमो लालूप्रसाद यादव यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. ओवेसी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसवेक संघावर (आरएसएस) टीका करत जातीयवादी शक्तींविरोधात एकत्र येत मजबुतीने लढण्याची गरज असल्याचे आवाहन केले. लालूप्रसाद यादव तुम्ही जातीयवाद्यांविरोधात एकटे लढू शकत नाहीत. जर तुम्हाला लढायचे असेल तर दृढतेने लढले पाहिजे. सीमांचलला त्यांचे अधिकार देण्यात आले तर बिहारच्या मुसलमानांच्या जीवनात बदल होईल. एमआयएम यासाठी तयार असल्याचे ते म्हणाले.

यापूर्वी मंगळवारीही ओवेसी यांनी संघाचे नेते इंद्रेश कुमार यांच्यावर टीका करत संघ पाखंडी असल्याची टीका केली होती. इंद्रेश कुमार यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. याचा समाचार ओवेसी यांनी घेतला होता. संघ अशापद्धतीचे शब्दप्रयोग करून लोकांचे मूळ मुद्द्यांवरून लक्ष हटवत आहे. इतकंच वाटत असेल तर संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्विपक्षीय व्यापार बंद करण्यास सांगा. संघाच्या नेत्यांचा हेतू हा खोटेपणा लपवण्याचा आहे. देशातील लोक राष्ट्रवादात बुडून जावेत आणि त्यांचे वास्तविक मुद्यांवरून लक्ष हटावे, असा प्रयत्न केला जातो. ते म्हणाले, इंद्रेश कुमार आणि इतर संघाच्या नेत्यांनी पंतप्रधान जे स्वत: स्वंयसेवक आहेत. त्यांच्याकडे गेले पाहिजे आणि त्यांना चीनबरोबरचा द्विपक्षीय व्यापार बंद करण्याचा सल्ला द्यावा, असे म्हटले.

दरम्यान, लालूप्रसाद यादव यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विजयाचा रथ रोखण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ममता बॅनर्जी आणि काँग्रेससहित अनेक विरोधी पक्षांनी भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याबाबत मत व्यक्त केले आहे.