केरळमधील इडुक्की जिल्ह्यात तुफान पाऊस पडत असून पर्यटन स्थळ असणाऱ्या मुन्नार येथून २५ किमी अंतरावर भूस्खलन झालं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. परिसरात ७० ते ८० लोक वास्तव्यास असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८० जणांची सुखरुप सुटका कऱण्यात आली आहे. अजून किती लोक अडकले आहेत याची माहिती सध्या प्रशासन घेत आहे.

तालुका अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, गावाला जोडणारा पूल पावसात वाहून गेला असल्याने तिथे पोहोचण्यात अेक अडचणी आहेत. सतत सुरु असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी बचावकार्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत मागितली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना झाली असून यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर १० जणांची सुटका करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच वनअधिकारी तसंच इतर विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी भारतीय हवाई दलाकडे मदत मागितली असून ट्विटदेखील केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी घटनास्थळी एनडीआरएफ टीम दाखल झाली असल्याची माहिती दिली आहे.

“भूस्खलन झाल्याने अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफचं पथक पाठवण्यात आलं आहे, पोलीस, अग्निशमन दल, वन तसंच महसूल अधिकारी यांना बचावकार्यात सहभागी होण्याचा आदेश दिला आहे. अजून एक टीम लवकरत घटनास्थळी दाखल होणार आहे,” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये दिली आहे.

आरोग्य मंत्री केके शैलजा यांनी मोबाइल मेडिकल टीम आणि १५ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या असल्याची माहिती दिली आहे. रुग्णालयांना उपचारासाठी सज्ज राहण्याची सूचना करण्यात आलेली आहे.