नासाच्या वैज्ञानिकांचे संशोधन
पृथ्वीबाहेर जीवसृष्टीचे अस्तित्व शोधण्याच्या हेतूने नासाच्या वैज्ञानिकांनी रसायने ओळखणारा केमिकल लॅपटॉप विकसित केला असून तो सहज कुठेही नेता येण्यासारखा आहे. त्याच्या मदतीने अवकाशात कुठेही असलेली अमायनो आम्ले व मेदाम्ले ओळखता येतात. नासाच्या कॅलिफोíनयातील पॅसेडेनात असलेल्या जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळेत या लॅपटॉपची निर्मिती सुरू आहे. या लॅपटॉपच्या मदतीने अवकाशातील रासायनिक नमुन्यांचे विश्लेषण करता येते.
नासाच्या जेसिका क्रीमर यांनी सांगितले की, हा लॅपटॉप अवकाशात पाठवला जाणार असून आतापर्यंत पृथ्वीवरून पाठवण्यात आलेले ते सर्वात संवेदनशील यंत्र असणार आहे, ते अमायनो आम्ले व मेदाम्ले यांचे विश्लेषण करू शकेल. स्टार ट्रेकमधील ट्रायकॉर्डरप्रमाणे हा लॅपटॉप असणार असून तो आकाराने लहान असणार आहे. कालांतराने हा लॅपटॉप मंगळ ग्रह किंवा युरोपा उपग्रहावरही पाठवता येईल. नेहमीच्या लॅपटॉपइतका त्याचा आकार असला तरी त्याची जाडी मात्र अधिक आहे कारण रासायनिक विश्लेषणासाठी ती जागा आवश्यक आहे. ट्रायकॉर्डर ही काल्पनिक यंत्राची गोष्ट होती. हा रासायनिक लॅपटॉप मात्र रसायनांचे विश्लेषण करणार आहे.
आम्ही तयार करीत असलेले हे रसायने विश्लेषण यंत्र लॅपटॉपप्रमाणे वेगवेगळ्या कामांसाठी वापरता येईल किंवा त्याला तशा आज्ञावली देता येतील, असे जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीचे पीटर विलीस यांनी सांगितले. आपल्या नेहमीच्या लॅपटॉपप्रमाणे यंत्रणा यात असणार नाही. त्यातील सर्व उपयोजने वेगळी आहेत ती अमायनो आम्ले व मेदाम्ले यांचे पृथक्करण करणारी आहेत. अमायनो आम्ले ही प्रथिनांचा मूळ घटक असतात तर मेदाम्ले ही पेशींच्या आवरणाचा घटक असतात, दोन्ही जीवसृष्टीशी आवश्यक असले तरी निर्जीव घटकात आढळू शकतात. अमायनो आम्ले ही डावी व उजवी असतात ती एकमेकांच्या आरशातील प्रतिमा असाव्यात तशी असतात पण त्यांचे घटक मात्र सारखेच असतात. काही वैज्ञानिकांच्या मते पृथ्वीवरील जीवसृष्टी डावी अमायनो आम्लांच्या वापरातून निर्माण झाली पण ती नंतर जीवसृष्टीच्या इतिहासात महत्त्वाची मानली गेली. जर डावी व उजवी अमायनो आम्ले ५०-५० टक्के प्रमाणात असतील तर ती जैविक घटकातील नाहीत असे समजावे असे मत क्रिमर यांनी मांडले आहे, पण डावी किंवा उजवी अमायनो आम्ले जर एकमेकांपेक्षा अधिक असतील तर इतर ग्रहावर जीवसृष्टी आहे असे समजायला जागा आहे. जेव्हा हा लॅपटॉप मेदाम्ले तपासणीसाठी घेईल तेव्हा त्यांच्यातील कार्बन साखळी किती मोठी आहे यात वैज्ञानिकांना स्वारस्य आहे. कारण त्यामुळे जीवसृष्टी आहे की नाही या निष्कर्षांप्रत येता येते. बॅटरीवर चालणारा हा लॅपटॉप द्रव नमुनेही तपासू शकतो जे मंगळासारख्या ग्रहावर सापडणे अवघड आहे.