अमेरिकेतील लास वेगास शहरात सोमवारी हल्लेखोरांनी एका कॅसिनोत सुरू असलेल्या संगीत समारंभात अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये ५० जण ठार झाले असून २०० हून अधिक लोक जखमी झाले असल्याचे एएफपी या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. पोलिसांनी एका हल्लेखोराचा खात्मा केला आहे. आणखी एका हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारला गेलेला हल्लेखोर हा स्थानिक रहिवासी होता.  जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून हा गोळीबार सनसेट स्ट्रिप परिसरातील मँडले बे कॅसिनोजवळ झाला.

 

 

दोन ते तीन हल्लेखोर कॅसिनोत घुसले आणि त्यांनी ३२ व्या मजल्यावरून गोळीबार करण्यास सुरूवात केल्याचे सांगण्यात येते. अचानक सुरू झालेल्या गोळीबारामुळे एकदम पळापळ सुरू झाली. सोशल मीडियावर कार्यक्रमस्थळी गोळीबारानंतर झालेल्या पळापळीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत गोळीबाराचा आवाजही ऐकू येतो. घटनेनंतर पोलिसांनी लगेच परिसराचा ताबा घेतला. विद्यापीठाच्या वैद्यकीय विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार १४ जणांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी नागरिकांना या भागात जाण्यास मज्जाव केला आहे.

तत्पूर्वी, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मँडले बे रिसॉर्ट आणि कॅसिनो येथे एका हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. आम्ही मँडले बे कॅसिनोच्या परिसरात सक्रिय असलेल्या हल्लेखोराचा शोध घेत आहोत. नागरिकांनी या परिसरापासून दूर राहावे, असे ट्विट लास वेगास मेट्रोपोलिटन पोलिसांनी केले आहे.

रूट ९१ हार्वेस्ट  कंट्री या संगीत समारंभात उपस्थित लोकांना अचानक गोळीबाराचा आवाज आला. संगीत समारंभातील लोक घाबरून सैरावैरा पळताना दिसले. हाॅटेलच्या आत स्वॉटची टीम पाठवली आहे. २९ व्या मजल्यापर्यंत पोलीस पोहोचले असून ३२ व्या मजल्यापर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.