दोन दिवसांपूर्वी श्रीनगरजवळील हैदरपोरामध्ये लष्कराच्या तुकडीवर झालेल्या गोळीबारामागे लष्करे तैय्यबाचा हात असल्याची माहिती पुढे आलीये. या हल्ल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिदीनने स्वीकारली असली, तरी प्रत्यक्षात पाकिस्तानस्थित लष्करे तैय्यबाने या कटाचे नियोजन आणि अंमलबजावणी केली होती, असे तपासातून स्पष्ट झाले.
लष्कराच्या तुकडीवर सोमवारी झालेल्या गोळीबारात आठ जवान शहीद झाले होते. हल्लेखोरांमध्ये लष्करे तैय्यबाच्या दोन अतिरेक्यांचा सहभाग होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानमधून दहा दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. त्याच गटातील दोघांनी या हल्ल्यामध्ये सक्रीय सहभाग घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ले करणारे दोघेजण ऊर्दूमध्ये बोलत होते. त्यांच्या बोलण्यातही ते पाकिस्तानातून आल्याचा आणि काश्मिरी नसल्याचा उल्लेख आला होता.
जम्मू-काश्मीर पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान दहशतवाद्यांचा अद्याप शोध घेताहेत. दरम्यान, सोमवारी लष्कराच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रेला धोका असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.