हैदराबादच्या निजाम वस्तू संग्रहालयातून सोन्याचा रत्नजडित डबा, रत्नजडीत कप आणि अनेक मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. तीन कप्पे असलेला टिफिन बॉक्स हा सुमारे २ किलो वजनाचा हा बॉक्स होता. तो सोन्याचा होता आणि त्याला हिरे आणि रत्नं जडवण्यात आली होती अशीही माहिती पोलिसांनी दिली. हैदराबाद येथील निजामाच्या हवेलीत वस्तू संग्रहालय आहे. या वस्तू संग्रहालयात निजाम काळातील अनेक मौल्यवान वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरी झाली आहे. तसेच निजाम वापरत असत तो सोन्याचा कपही चोरीला गेला आहे. यासह एक सोन्याचा चमचा आणि इतरही सोन्याच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत अशीही माहिती समजते आहे. या सगळ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत ५० कोटींच्या घरात आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून त्या आधारे चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. चोरट्यांच्या तपासासाठी पोलिसांची १० पथके तयार करण्यात आली आहेत. जेव्हा संग्रहालय प्रशासनाकडून आम्हाला चोरीची माहिती मिळाली तेव्हा आम्ही या ठिकाणी आलो आणि सगळा परिसर सील केला, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

चोरांनी झरोक्याद्वारे संग्रहालयात प्रवेश केला असावा आणि त्याआधी त्यांनी दोरीने भिंतींची उंची मोजली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आता पुढील तपास सुरू असून त्यातून काय तथ्य बाहेर येईल ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेणे सुरू आहे असेही पोलिसांनी म्हटले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

सध्याच्या घडीला या वस्तू संग्रहालयाकडे सुमारे ४५० मौल्यवान वस्तू आहेत. या वस्तू निजाम यांच्या वापरातील आहेत असेही संग्रहालय प्रशासनाने म्हटले आहे. तसेच या वस्तू प्रदर्शनात लोकांना पाहण्यासाठी मांडून ठेवल्या जातात. या वस्तूंची किंमत सद्यस्थिती २५० ते ५०० कोटींच्या घरात आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर श्वान पथक आणूनही तपासणी करण्यात आली आहे असेही पोलिसांनी सांगितले. तसेच हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार आणि इतर अधिकाऱ्यांनीही वस्तू संग्रहालयाला भेट दिली.