गानकोकिळा लता मंगेशकर या देशाची शान आहेत. आपल्या या असामान्य कर्तृत्वाचा गैरवापर करून कोणी राजकीय लाभ मिळविण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना, या बाबत त्यांनी सावध राहावे, असे मत काँग्रेस पक्षाने व्यक्त केले आहे.‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गाण्याला ५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोमवारी मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमवेत लतादीदी एकाच व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्यानंतर काँग्रेसने सावध राहण्याचा इशारा दिल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
लतादीदी या असामान्य कर्तृत्वाच्या असल्याने आम्ही नेहमीच त्यांच्यासमोर नतमस्तक आहोत. ही माणसे देशाची संपत्ती आहेत. त्यामुळे आपल्या या कर्तृत्वाचा कोणीही राजकीय लाभ उठविणार नाही ना, या बाबत अशा असामान्य प्रभृतींनी नेहमीच सावध राहिले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी म्हटले आहे.