भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चांद्रयान २ या महत्त्वाकांक्षी अवकाशयानाचे उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे रद्द झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र हा तांत्रिक बिघाड नेमका काय होता ते आता समोर आले आहे. चांद्रयान २ च्या इंजिनमधील गळतीमुळे हे उड्डाण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती आता समोर आली आहे. GSLV MK 3 च्या क्रायोजेनिक इंजिनातील हेलियमच्या गळतीमुळे ही मोहीम स्थगित करण्यात आली. सोमवारी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी या चांद्रयानाचं उड्डाण होणार होतं मात्र उड्डाणाच्या ५६ मिनिटं आधी ते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण देऊन हे उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती इस्त्रोने दिली होती. मात्र पाच विविध सूत्रांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला हेलियमच्या गळतीबाबत माहिती दिली आहे. त्याचमुळे हे उड्डाण रद्द करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे आम्ही उड्डाण थांबवतो आहोत अशी घोषणा करण्यात आली आणि लवकरच उड्डाणाची तारीख जाहीर करण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं. तांत्रिक बिघाड नेमका काय झाला होता ते आता या बातमीमुळे समोर आलं आहे.

इंजिनात लिक्विड ऑक्सिजन आणि लिक्विड हायड्रोजन भरल्यानंतर हेलियम भरण्याचे काम सुरु होते.  आम्हाला हेलियम भरायचे होते आणि आऊटपुट ५० वर सेट करायचे होते. मात्र हेलियमचे प्रेशर खाली येऊ लागले हे आम्ही पाहिले. असे होणे म्हणजे गळती होते आहे हे आम्हाला समजले अशी माहिती एका वरिष्ठ वैज्ञानिकाने इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे. गळती एकाच ठिकाणाहून होते आहे की अनेक ठिकाणांहून होते आहे हे आम्ही तपासण्यास सुरुवात केली असंही त्यांनी सांगितलं