ग्रामीण भागांतील मुलांमध्ये वाचन व अध्ययनक्षमता फारच कमी असून खालच्या इयत्तांमधील मुलांना साधी गणिते सोडवता येत नाहीत आणि इंग्रजी वाचताच येत नाही, असे धक्कादायक वास्तव ‘प्रथम’ या संस्थेने जारी केलेल्या २०१४ या वर्षांच्या अहवालात उघड झाले आहे. विशेष म्हणजे ‘सर्वशिक्षा अभियान’मुळे पटसंख्येत लक्षणीय वाढ होत असली तरी शिक्षणात मुले कच्चीच राहात आहेत. सुमारे १५ हजारांहून अधिक सरकारी शाळांच्या सखोल पाहणीवर हा अहवाल आधारित असल्याने शिक्षण क्षेत्रासाठी ही इशाराघंटाच मानली जात आहे.
शिक्षण पद्धतीत मुलांना मदत करण्यासाठी लवचिकतेचा अभाव आहे. अभ्यासक्रम व मुलांची अध्ययन क्षमता यात फरक आहे त्यामुळे ही स्थिती झाली आहे असे अहवालात म्हटले आहे. ८८४४ प्राथमिक तर ६३६२ उच्च प्राथमिक शाळांच्या पाहणीतून हा अहवाल साकारला आहे. एकटय़ा तामिळनाडूत गणितात सुधारणा दिसून येत असली तरी इतर राज्यांत अध्ययनाची बोंबच आहे, हे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.   
पटावरील विद्यार्थी संख्या मात्र वर्षांगणिक वाढत असल्याचे अहवालावरून दिसते. ६ ते १४ वयोगटातील मुलांची पटसंख्या ९६ टक्के आहे. या वयोगटात ओळीने सहा वर्षे मुलांची शाळेत दाखल होण्याची संख्या ही जागतिक पातळीवरील पटसंख्येच्या जवळपास येत आहे. ग्रामीण भागांत खासगी शाळांमध्ये जाण्याचे प्रमाण ६-१४ वयोगटात ३०.८ टक्के झाले आहे. २०१३ मध्ये खासगी शाळात जाण्याचे प्रमाण २९ टक्के होते.

अहवालातील वास्तव
* इयत्ता पाचवीतील पटावरील २५ टक्के मुलांनादेखील इंग्रजी वाक्ये वाचता येत नाहीत व तिसऱ्या इयत्तेतील २६ टक्के मुलांना दोन अंकी वजाबाकी येत नाही.
* आठवीतील मुलांना भागाकार करता न येण्याचे प्रमाण २०१० पासून कमी होत आहे. आठवीतील विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येचे भागाकार करता येत नाहीत अशा विद्यार्थ्यांची संख्या २०१० मध्ये ६८.३ टक्के होती ती आता २०१४ मध्ये ४४.१ टक्के झाली आहे.
प्राथमिक शिक्षणाची दशा व दिशा
* भाषा वाचनात असमर्थता
* भागाकार, वजाबाकीत अपयश
* तामिळनाडूची थोडी प्रगती, बाकी राज्ये मागेच

दुसरीतील १९.५ टक्के विद्यार्थ्यांना ० ते ९ अंकदेखील ओळखता येत नाहीत. २००९ मध्ये अशा मुलांची संख्या ११.३ टक्के होती. त्यात घट न होता भर पडली आहे. मुलांची भाषा वाचनाची क्षमताही कमीच असून ते चित्र बदललेले नाही. २०१४ मध्ये पाचवीतील २५ टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजी वाक्ये वाचता येत नसल्याचे दिसून आले. हे प्रमाण २००९ पासून बदललेले नाही.
– रुक्मिणी बॅनजी, संचालिका ‘प्रथम’