लेबनॉनची राजधानी असणाऱ्या बैरुतमध्ये पुन्हा एका भीषण आग लागली आहे. महिनाभरापूर्वीच स्फोटांनी हादरलेल्या बैरुतच्या बंदरांवर पुन्हा एकदा आगीच्या उंचच उंच ज्वाला दिसून आला. मात्र मागील वेळेप्रमाणे यावेळेस विस्फोटाचा आवाज आला नाही. या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. ४ ऑगस्ट रोजी बैरुतमध्ये झालेल्या भीषण स्फोटामध्ये १९० जणांचा मृत्यू झाला होता तर सहा हजारहून अधिक जण जखमी झाले होते.

गुरुवारी दुपारच्या सुमारास बैरुतच्या बंदराजवळील भागांमध्ये आगीच्या उंच ज्वाला दिसू लागल्या. मोठ्या प्रमाणा धुराचे लोट शहरामध्ये आल्याने लोकांना पुन्हा स्फोट झाला की काय असं वाटू लागलं. ही आग नक्की कशी लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र ‘अल जझिरा’ने दिलेल्या वृत्तानुसार लेबनॉनच्या लष्कराने ही आग बंदराजवळ असणाऱ्या ट्युटी फ्री सामानाच्या गोदामाला लागली आहे. या गोदामांमध्ये तेल आणि टायरचा साठा असल्याने आगीने भीषण रुप धारण केल्याचं सांगितलं जात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशामन दलाच्या गाड्यांबरोबरच हेलिकॉप्टर्सचीही मदत घेतली जात आहे. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार बंदराजवळील कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आगीच्या ज्वाला पाहून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बैरुतमध्ये ४ ऑगस्ट रोजी झालेल्या दोन मोठ्या स्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरलं होतं. या स्फोटांचा आवाज संपूर्ण शहरात घुमला आणि त्याचे हादरेही बसले. या महाभयंकर स्फोटांमुळे एकच हलकल्लोळ उडाला. या स्फोटांप्रकरणी बैरुत बंदर प्रशासनाच्या २० अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मुळात अमोनियम नायट्रेटचा २७५० टन इतका मोठा साठा इतकी वर्षे बंदराच्या गोदामात का ठेवण्यात आला होता याचा तपास केला जात आहे. बैरुत स्फोटांमुळे लेबनॉनमध्ये पंतप्रधानांसह संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागला.