लेबनॉनचे बैरुत शहर मागच्या आठवडयात शक्तीशाली स्फोटांनी हादरले. या स्फोटांमुळे सर्वसामान्यांच्या मनात सरकारविरोधात प्रचंड संतापाची भावना आहे. तिथली जनता सरकारवर चिडली आहे. हीच बाब ध्यानात घेऊन लेबनॉनच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने सोमवारी राजीनामा दिला.

मंत्रिमंडळाचा राजीनामा सुपूर्द करण्यासाठी पंतप्रधान हसन दियाब राष्ट्राध्यक्षाच्या निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री हमाद हसन यांनी दिली. बैरूतमध्ये झालेल्या स्फोटाच्या निषेधार्थ लेबनॉनमध्ये सरकारविरोधात मोठया प्रमाणावर निदर्शने, आंदोलने सुरु आहेत. चार ऑगस्टला बैरुत शहर दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी हादरले. यात १६० नागरिकांचा मृत्यू झाला तर ६ हजार नागरिक जखमी झाले. असोसिएटड प्रेसने हे वृत्त दिले आहे.

बैरुतमध्ये बंदरातील गोदामात साठवण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटच्या साठयामुळे हा स्फोट झाला. यामुळे आसपासचा परिसर अक्षरक्ष: बेचिराख झाला. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान हसन दियाब यांनी दूरचित्रवाहिनीवरुन संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी सुधारणा कार्यक्रमाचा आऱाखडा तयार करण्यासाठी वेगवेगळया गटांमध्ये एकमत घडवून आणण्यासाठी दोन महिने पदावर राहण्याचा प्रस्ताव दिला होता. पण मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांकडूनच त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत हसन दियाब यांचे सरकार काळजीवाहू सरकार म्हणून कामकाज पाहिलं.