बिहारमध्ये पुढील महिन्यात विधानसभेच्या १० जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आता तीन मोठय़ा डाव्या पक्षांची आघाडी झाली असून, कोणत्या पक्षाने किती जागा लढावयाच्या त्याचा निर्णयही झाला आहे. नव्या आघाडीनुसार आता भाकप (एमएल) पाच जागा, तर माकप आणि भाकप अनुक्रमे तीन आणि दोन जागा लढविणार आहे, असे तिन्ही पक्षांच्या राज्य सचिवांनी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.बिहारमध्ये तीन मोठय़ा डाव्या पक्षांनी प्रथमच पूर्ण आघाडी केली असून तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी येणार आहेत, असे भाकपचे सचिव राजेंद्र प्रसाद सिंह यांनी सांगितले. भाजप आणि जद(यू), राजद, काँग्रेसची धोरणे जनविरोधी असल्याने अशी आघाडी होणे ही काळाची गरज आहे, असेही सिंह म्हणाले.