‘आप आमदारांची अपात्रता, गुजरात निवडणुकीबाबत परस्पर निर्णय घेतल्याने आयोगाच्या प्रतिष्ठेला धक्का’

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आयोगाचे विधि सल्लागार एस. के. मेंदिरत्ता यांनी आक्षेप घेतले आहेत. ‘आप’च्या २० आमदारांना अपात्र ठरवण्याचा तसेच, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा एकाच वेळी जाहीर न करण्याचा निर्णय आपल्याशी कोणतीही चर्चा न करता घेण्यात आला, अशी टीका मेंदिरत्ता यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ या कार्यक्रमात केली. मेंदिरत्ता हे गेली ५० वर्षे केंद्रीय निवडणूक आयोगाचे सल्लागार आहेत. मात्र, आता त्यांनी आयोगासाठी काम करणे थांबवले आहे.

विधि सल्लागाराला डावलून घेतलेल्या निर्णयावर निवडणूक आयोगाला माघार घ्यावी लागली आहे. आमदारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी न देताच आयोगाने २० आमदारांना अपात्र ठरवल्याचा युक्तिवाद योग्य मानून दिल्ली उच्च न्यायालयाने आमदारांची अपात्रतता रद्द केली होती. आपला सल्ला घेतला असता तर आयोगाला नामुष्की सहन करावी लागली नसती, अशी टिप्पणी मेंदिरत्ता यांनी केली. २३ जून २०१७ मध्ये आयोगाच्या समितीने पुढील सुनावणी घेतली जाईल असे आपच्या आमदारांना स्पष्ट केले होते. तोपर्यंत मेंदिरत्ता ‘आप’च्या प्रकरणाशी जोडलेले होते. मात्र, त्यानंतर सुनावणी न करताच निवडणूक आयोगाने ‘आप’ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला.