भारताचा शांततेवर विश्वास आहे पण जर एखाद्या शेजारी देशाने आक्रमण करून विस्तारवादी दु:साहस केले तर त्याला सडेतोड उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत, असा इशारा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात दिला. त्यांचा रोख अप्रत्यक्षपणे सीमेवर तिढा निर्माण करणाऱ्या चीनवर होता.

चीनचे नाव न घेता ते म्हणाले की, जगातील सगळे देश कोविड १९ साथीच्या विरोधात लढत असताना आपल्या एका शेजारी देशाने विस्तारवादी दु:साहसाचा प्रयत्न केला. त्या वेळी आमच्या सैनिकांनी शौर्य गाजवून देश रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. भारतमातेचे ते सुपुत्र देशासाठी प्राणपणाने लढले. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षांतील या हुतात्म्यांना सगळा देश आज सलाम करीत आहे. चिनी लष्कराने पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात केलेल्या हिंसाचारात भारताचे २० जवान १५ जून रोजी शहीद झाले होते.

पुढे ते म्हणाले की, आत्मनिर्भर भारत मोहिमेची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी गैरसमजातून घाबरून जाऊ नये, कारण आत्मनिर्भर भारत याचा अर्थ जगापासून फटकून न राहता स्वयंपूर्णता प्राप्त करणे असा आहे. त्यामुळे परदेशी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्यास घाबरण्याचे कारण नाही.

कोविड १९ साथीच्या मुद्दय़ावर त्यांनी सांगितले की, या पेचप्रसंगात जी कामगिरी डॉक्टर, परिचारक, आरोग्य कर्मचारी यांनी केली त्यासाठी देश त्यांचा कायम ऋणी राहील. त्यांनी आघाडीवर राहून या रोगाविरोधात लढा दिला. मोदी सरकारनेही या साथीच्या रोगाला वेळीच योग्य प्रतिसाद देत हे आव्हान समर्थपणे पेलले. लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या या देशात हे आव्हान पेलणे सोपे नव्हते.

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा क्षणही अभिमानास्पद होता, असे त्यांनी स्पष्ट केले. रामजन्मभूमीच्या प्रश्नावर देशातील जनतेने प्रदीर्घ काळ संयम दाखवला. तो प्रश्न अखेर न्यायालयाच्या मार्फत निकाली निघाला. यातील संबंधित पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आदराने स्वीकारला व भारतात शांतता, अहिंसा, प्रेम व सुसंवाद यालाच महत्त्व आहे हे जगाला त्यातून दाखवून दिले, असे त्यांनी सांगितले.

गलवानमध्ये जवानांच्या शौर्याने आपण शांततेवर विश्वास ठेवतो हे दाखवून दिलेच शिवाय कुणी आक्रमण केले तर तसेच चोख उत्तर मिळेल याची प्रचीती दिली. आपली लष्करी, निमलष्करी दले देशाची सुरक्षा करीत आहेत त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो.

– रामनाथ कोविंद, राष्ट्रपती