दिल्लीच्या दंगलग्रस्त इशान्यभागातील जनजीवन शनिवारी हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. सुरक्षा रक्षकांची गस्त वाढविण्यात आल्यानंतर काही दुकाने उघडण्यात आली तेव्हा नागरिकांनी घराबाहेर पडून जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि औषधांची खरेदी केली.

शनिवारी सकाळपासूनच सफाई कामगारांनी रस्त्यांवर पडलेला दगडविटांचा, कांचाचा खच आणि जळलेल्या वाहनांचे सांगाडे उचलण्याचे काम सुरू केल्याचे दिसत होते. काही ठिकाणी दगडविटांचा खच मोठय़ा प्रमाणात होता तेथे बुलडोझरचा वापर करावा लागल्याचे पाहावयास मिळत होते. जाफराबाद, मौजपूर, यमुना विहार, चांद बाग, मुस्तफाबाद आणि भजनपुरा या परिसरांना जातीय दंगलीचा सर्वाधिक तडाखा बसला त्या परिसरातील रस्त्यांवर वाहनांची आणि नागरिकांची गर्दी पाहावयास मिळाली.

शाळा ७ मार्चपर्यंत बंद

ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर, या भागातील शाळा ७ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

हिंसाचारग्रस्त भागांत शाळांच्या वार्षिक परीक्षा घेण्यासाठी योग्य वातावरण नसल्यामुळे या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या असल्याचीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मेघालयमध्ये ‘सीएए’च्या वादातून दोन ठार

शिलाँग : मेघालयात नागरिकत्व कायदा व इनर लाइन परमिट (अंतर्गत परवाना) या मुद्दय़ांवर आयोजित  बैठकीवेळी  खासी विद्यार्थी संघटना व आदिवासेतर यांच्यातील चकमकीत एक जण ठार झाला. शिलाँगमध्ये मागे घेतलेली संचारबंदी दुपारपासून पुन्हा लागू करण्यात आली.  तेथे लेहदूह बाजारपेठेत एका स्थलांतरित मजुराची भोसकून हत्या करण्यात आली. सहा जिल्ह्य़ात इंटरनेट बंदी लागू करण्यात आली आहे.

दिल्ली सरकारचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 

समाज माध्यमांवर प्रक्षोभक संदेश वितरित करण्यांविरुद्ध  तक्रार करता यावी यासाठी दिल्ली सरकार एक व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जारी करण्याचा विचार करीत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

अमर्त्य सेन यांच्याकडून चिंता व्यक्त 

दिल्लीतील हिंसाचाराबद्दल नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी चिंता व्यक्त केली. धर्मनिरपेक्ष देशाच्या राजधानीत अल्पसंख्याकांना लक्ष्य केले गेले, पोलीस प्रभाव दाखवू शकले नाहीत, असे ते म्हणाले.