प्रवासी रेल्वेसेवेप्रमाणे प्रवासी विमानसेवेलाही परवानगी देण्याची प्रक्रिया नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सुरू केली आहे. त्यासाठी नियम बनवले जाणार असून मार्गदर्शक तत्त्वांना अंतिम रूप देण्यासाठी विमान कंपन्या व विमानतळांकडून शिफारशी मागवण्यात आल्या आहेत. यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

प्रत्येक प्रवाशाला मोबाइलवर आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणे सक्तीचे केले जाईल. हातातील बॅग विमानात घेऊन जाण्याची परवानगी दिली जाणार नाही तसेच, उड्डाणापूर्वी किमान दोन तास आधी विमानतळावर पोहोचावे लागेल. या किमान तीन अटींचे पालन करणे प्रवाशांना बंधनकारक केले जाण्याची शक्यता आहे. सेतू अ‍ॅपवर हिरव्या रंगाचा मार्गदर्शक असेल तरच विमानतळावर आतमध्ये जाण्यास परवानगी दिली जाईल. प्रवाशांना वेबचेक-इन करावे लागेल तसेच, प्रवासासाठी जाणाऱ्या आणि प्रवास करून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या शारीरिक तापमानाची तपासणी केली जाईल.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी करोनाशी निगडित नवे नियम तयार केले आहेत. त्यावर विमान क्षेत्रातील कंपन्या, तज्ज्ञांशी चर्चा केली जात असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. टाळेबंदी लागू झाल्यानंतर २५ मार्चपासून देशांतर्गत तसेच, आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती. आता टाळेबंदी शिथिल केली जात असल्याने तसेच, प्रवासी रेल्वेसेवा मंगळवारपासून मर्यादित स्वरूपात सुरू केली गेली असल्याने विमानसेवा पूर्ववत करण्याचा विचार केला जात आहे.

नव्या नियमांची प्रवाशांनी माहिती करून घेणे गरजेचे आहे. विमानतळावरील सर्व नियमित प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागण्याची शक्यता प्रवाशांनी गृहीत धरावी. कमीत कमी सामानासह प्रवास करावा. शारीरिक अंतर ठेवण्याची व आसपासच्या वस्तूंना कमीत कमी स्पर्श करण्याचीही सवय लावून घ्यावी लागेल, अशा बाबींचा संभाव्य मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समावेश असेल.

अन्य शिफारशी..

* वैमानिक व विमानसेवा कर्मचारी न बदलत कायम ठेवले जातील.

* प्रवाशांसाठी लागू होणारे नियम विमानतळावरील सुरक्षारक्षक व  अन्य सेवा कर्मचाऱ्यांनाही बंधनकारक राहतील.

* ओळखपत्र दाखवून विमानतळावर आत सोडण्याची प्रक्रिया थांबवली जाईल.

* वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर प्रवाशाची व्यवस्था करण्यासाठी तीन रांगा मोकळ्या ठेवल्या जातील.

* प्रत्येक रांगेतील मधली जागा मोकळी सोडली जाण्याची शक्यता.

६ हजार भारतीय परतले

‘वंदे भारत’ मोहिमेच्या पहिल्या पाच दिवसांमध्ये एअर इंडियाने विदेशातून भारतासाठी ३१ विमानांचे उड्डाण केले. करोना विषाणूमुळे लागू झालेल्या टाळेबंदीमुळे जगभरात अडकून पडलेले ६०३७ भारतीय या विमानांमधून आपल्या देशात परत आले, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी सांगितले. १२ देशांमध्ये अडकलेल्या १५ हजार भारतीयांना परत आणण्यासाठी ६४ विमानांचे संचालन करण्यात येणार आहे.