असहिष्णुतेच्या वादात आता करण जोहर यांची उडी
चित्रपट निर्माते करण जोहर यांनी असहिष्णुतेच्या मुद्दय़ावर वक्तव्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली त्यामुळे एक नवा वाद आता सुरू झाला आहे. यापूर्वी अभिनेता आमीर खाननेही देशात राहणे असुरक्षित वाटत असल्याचे पत्नीने सांगितल्यामुळे देश सोडून जाणार होतो असे वक्तव्य केले होते. मोदी सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा घालत असल्याचा आरोप करण जोहर यांनी केला तर भाजपने भारत हा सर्वात सहिष्णु देश असल्याचे प्रत्युत्तर
दिले. असहिष्णुतेची चर्चा आता पुन्हा रंगली असून जोहर यांनी सांगितले की, भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची
भाषा करणे म्हणजे विनोद आहे, तर आपली लोकशाही हा दुसरामोठा विनोद आहे. आपण लोकशाही राष्ट्र कसे म्हणवतो याचेच मला आश्चर्य वाटते, चित्रपट व इतर ठिकाणीही मला सतत बंधने जाणवतात. जयपूर येथील साहित्य महोत्सवात ते बोलत होते. जोहर यांच्या वक्तव्याचा फायदा उठवत काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी मोदी सरकार बुद्धिमंतांच्या व उदारमतवादी व्यक्तींच्या विरोधात असल्याची टीका केली. अनुपम खेर हे सरकारच्या जवळचे आहेत ते सोडून बाकी कलाकार, चित्रकार, चित्रपट निर्माते सरकार बुद्धिमंतांच्या विरोधात असल्याचेच सांगत आहेत, असे ते म्हणाले.