करोना व्हायरसशी लढा देण्यासाठी आणि हा व्हायरसची अनेकांना लागण होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन काही ठिकाणी मर्यादित स्वरूपात सुरू राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकाच वेळी सगळीकडे लॉकडाउन उठवण्यापेक्षा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करोना व्हायरसचे रुग्ण आहेत तेथे मर्यादित स्वरूपात लॉकडाउन सुरू ठेवण्याचा विचार सरकार करत आहे.

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवरुन सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधला. परिस्थितीचा आढावा घेताना मोदी यांनी काही महत्वाच्या सूचनाही केल्या. लॉकडाउन संपल्यानंतरच्या नियोजनाबाबत त्यांनी काही महत्वाचे सल्ले दिले. सध्या देशात सुरु असलेला २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिल रोजी संपणार आहे. लॉकडाउन संपल्यानंतर लगेच रस्त्यावर गर्दी होणार नाही. याची काळजी घ्यावी. २१ दिवसानंतर रस्त्यावर पुन्हा गर्दी होणार नाही, यासाठी रणनितीची गरज असल्याचे मोदी म्हणाले.

शुक्रवारी एका सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिले आहे. त्यात सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, “ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या अधिक आहे किंवा ती वाढण्यीच भीती आहे अशा काही ठिकाणांची यादी तयार करू शकलो तर पुढे काय निर्णय घ्यायचा हे सोपं होईल. असे शकडो ठिकाणं असू शकतात. उर्वरित भागात काही चिंतेची बाब नाही, असे आम्हाला दिसले तर तेथील लॉकडाउन पूर्णपणे काढला जाऊ शकतो. तेथील जनजीवन सुरळीत होऊ शकतं. ज्या भागांमध्ये करोनाची भीती कायम असेल तेथे मात्र काही प्रमाणा किंवा मर्यादित स्वरूपात लॉकडाउन कायम ठेवला जाऊ शकतो.” या अधिकाऱ्याने सांगितले की, “असं केल्याने जिथे धोका अधिक आहे तेथेच जास्त लक्ष केंद्रित करता येईल.”

“लॉकडाऊन संपल्यानंतर १५ एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्प्या-टप्प्याने लोक, वसाहती, भाग सुरु होतील हे पाहावे असे मोदी यांनी स्पष्ट केले होते. “राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातील स्थितीनुसार टप्प्या-टप्प्याने याचे नियोजन करावे. कुठेही एकदम लोंढे बाहेर दिसतील व सर्व काही व्यवस्थित सुरु झाले आहे असे समजून लोक रस्त्यावर येतील असे न देऊ नका,” अशा सूचनाही मोदी यांनी दिल्या होत्या.