उत्तर प्रदेशसह पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणूक निकालांचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. उत्तर प्रदेशात भाजपचे ‘कमळ’ फुलले आहे, असे आतापर्यंतचे चित्र आहे. दोनशेहून अधिक जागांवर भाजपला आघाडी मिळाली आहे. तर पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेस जोमात आहे.

उत्तरप्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपने उत्तरप्रदेशमध्ये चमकदार कामगिरी करत २३२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी समाजवादी पक्षाला मोठा हादरा बसला आहे. सप – काँग्रेस आघाडी ५९ जागांवरच पुढे आहे. अस्तित्वाची लढाई असलेल्या बसपलाही २८ जागांवरच आघाडी मिळाली आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश भाजपचे कमळ बहरणार असे दिसत आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अपेक्षेप्रमाणे मोठी आघाडी घेतली असून आम आदमी पक्ष (आप) दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अकाली दल व भाजप युतीचे अक्षरश: तीनतेरा वाजताना दिसत आहेत. पंजाब विधानसभेच्या ११७ जागांपैकी ९६ जागांचे कल हाती आली असून यामध्ये काँग्रेसने भक्कम आघाडी आहे. ९६ जागांपैकी काँग्रेसला ५५, आप आणि अकाली दल- भाजपच्या युतीला २१ जागांवर आघाडी मिळाली आहे.

गोव्यात भाजपला सरकारविरोधातील नाराजीचा फटका दिसताना दिसतो आहे. सुरुवातीचे कल हाती येत असताना काँग्रेसने आघाडी घेतली. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून काँग्रेसने अनेक मतदारसंघांमध्ये आघाडी कायम ठेवली आहे. यानंतर भाजपकडून काँग्रेसला जोरदार टक्कर दिली जाते आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याविरोधात असणारी नाराजी भाजपला भोवताना दिसते आहे. पार्सेकर स्वत: मांद्रे मतदारसंघात हजारपेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. ‘देवभूमी’ उत्तराखंडची सत्ता कोण पटकावणार हे आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे. एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार भाजपने अपक्षेप्रमाणे आघाडी घेतली आहे. सुरूवातीच्या कलानुसार भाजप ५० जागांवर तर काँग्रेस १३ जागांवर आघाडीवर आहे. सुरूवातीला आघाडीवर असलेले मुख्यमंत्री हरीश रावत हे आता हरिद्वार ग्रामीण मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. तरीही रावत यांनी उत्तराखंडमध्ये काँग्रेसचेच सरकार असेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

मणिपूरमध्ये दोन दिवसांपूर्वीच आलेल्या मतदानोत्तर चाचणीचा कौल भाजपच्या बाजूने असला तरी, सुरूवातीच्या टप्प्यातील मतमोजणीत हे चित्र पलटताना दिसत आहे. सुरुवातीपासूनच भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना येथे पाहायाला मिळत आहे. दोन्ही पक्षात चुरशीचा सामना दिसत आहे. ६० जागांपैकी २० जागांचे कल हाती येत असून भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी आठ आठ जागांवर आघाडीवर आहे. तर इरोम शर्मिला यांचा पिपल्स रिसर्जंस अॅण्ड जस्टिस अलायन्स मात्र अजूनही पिछाडीवरच दिसत आहे. थौबलमधून इरोम शर्मिला इबोबींना कडवी टक्कर देताना दिसत आहेत.