मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हे अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे नम्र आहेत. मध्य प्रदेशमध्ये आपल्या कामाची छाप सोडणाऱ्या शिवराज चौहान आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर भारताचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी मोलाची  भूमिका पार पाडावी, अशी पक्षाची इच्छा असल्याचे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी शनिवारी केले.
मध्य प्रदेश सरकारच्या वतीने राज्यात राबवण्यात येणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेचे उद्घाटन अडवाणी यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी बोलत होते.
वाजपेयी यांनी त्यांच्या कार्यकाळात देशभरात रस्त्यांचे जाळे उभारण्याबरोबरच अनेक विकासाच्या योजना यशस्वीपणे राबवल्या. मात्र तरीही ते नेहमी नम्रपणे वागले आणि कोणाशीही ते कठोर वागल्याचे आठवत नाही. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनीही मध्य प्रदेशमध्ये लाडली लक्ष्मी योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनांसह अनेक विकासाच्या योजना यशस्वीपणे राबवल्या. मात्र त्यांनी आपल्या कामाचा उदो उदो केला नाही तर वाजपेयींसारखे त्यांचे वर्तनही अतिशय नम्र असल्याचे अडवाणी म्हणाले.
त्यामुळे जगाच्या नकाशावर भारताचे नाव अग्रभागी ठेवण्यासाठी शिवराज चौहान आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकत्रितपणे काम करावे,अशी पक्षाची इच्छा आहे. भाजपशासित दोन्ही राज्यांनी केलेल्या विकासाचे भारताबाहेरही कौतुक होत असल्याचा दावाही अडवाणी यांनी केला.
दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने राज्यातील जनतेसाठी अन्न सुरक्षा योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत गहू आणि आयोडिनयुक्त मीठ एक रुपयात तर तांदूळ दोन रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.